लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/धनकवडी : अनैतिक संबंधातून वाल्हेकरवाडी येथील मठाधिपती महाराजानेच आकुडीर्तील एका व्यावसायिकाचा खून केल्याचा धक्कादायक प्रकारसमोर आला आहे. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह कात्रज घाटात टाकून अपघाताचा बनाव केला. मात्र भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास करून महाराजाचा कट उघडकीस आणला आहे.
याप्रकरणी महाराजासह चौघांना बेड्या ठोकल्या. मठाधिपती रमेश विलास कुंभार (वय ४९, रा. गुरुदेवनगर, आकुर्डी, सध्या रा. गोरखनाथ मंदिराजवळ, वाल्हेकरवाडी), सरोज आनंद गुजर (वय ४०, रा. चिखली, मूळ खारघर, ता. पनवेल), यश योगेश निकम (वय १९, रा. वाल्हेकरवाडी, शिवगोरक्षनाथ मठ, निगडी), अमोल रामदास बडदम (रा. शिवगोरक्षनाथ मठ, निगडी, वाल्हेकरवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
आनंद गुजर (वय ४४, रा. आकुर्डी) असे खून झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
याप्रकरणी त्यांचा भाऊ सुनील गुलाब गुजर (वय ३६, रा. खटाव, जि. सातारा) यांनी फिर्याद दिली. रमेश कुंभार व त्याच्या साथीदारांनी आनंद गुजर यांचा अनैतिक संबंध व प्रॉपर्टी वादातून खून केल्याची तक्रार केली.
भारती विद्यापीठ पोलिसांना शनिवारी सकाळी नागरिकांनी फोन करून कात्रज येथील नव्या बोगद्याजवळील हॉटेल मराठी शाहीसमोर एक मृतदेह पडला असल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केल्यावर तेथे एकाचा मृतदेह आढळून आला. त्याच्याजवळच एक दुचाकी पोलिसांना मिळाली. तिचा नंबर तपासला असता तो बनावट आढळून आला. पोलिसांनी चासी नंबरवरून गाडी मालकाचा शोध लावला. ही गाडी आनंद गुजर याची असल्याचे निष्पन्न झाले. मृतदेहाची ओळख पटल्यावर पोलिसांच्या तपासाला वेग आला.
पोलिसांनी केलेल्या तपासात गुजर याची पत्नी गेल्या ६ महिन्यांपासून वाल्हेकरवाडीतील मठात राहत असल्याचे आढळून आले. आनंद गुजर याच्या पत्नीच्या नावावर आयडिया कंपनीची एजन्सी आहे. तिने महाराजांना एक ब्रिझा कारही भेट दिली आहे. आनंद गुजर याचाही व्यवसाय होता. लॉकडाऊन झाल्यापासून तो बंद पडला आहे. पोलिसांनी मठातील सर्वांकडे चौकशीला सुरुवात केली. त्यातून हा खुनाचा प्रकार उघडकीस आला. आनंद गुजर हा शुक्रवारी सायंकाळी मठामध्ये गेला होता. तेथे त्याची पत्नी व महाराजांबरोबर जोरदार भांडणे झाली. या भांडणात महाराज, पत्नी व महाराजांच्या सेवेक-यांनी त्याला लाकडी बॅट व बांबूने बेदम मारहाण केली. या मारहाणीत आनंद याचा मृत्यू झाला. त्यामुळे ते सर्व गडबडून गेले. आनंद याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा कट महाराजाने आखला. त्याचा मृतदेह मोटारीत टाकला. आनंद याच्या दुचाकीचा नंबर बदलून ती घेऊन एक भक्त मोटारीबरोबर दुचाकीवरून कात्रज घाटात आला. त्यांनी आनंद याचा मृतदेह कात्रज येथील नव्या घाटात रस्त्याच्या कडेला टाकून दिला. जवळच त्यांची दुचाकी ठेवली. जेणे करून त्याला वाहनाने उडविल्याने त्याचा मृत्यू झालाचा भास निर्माण केला.
मृतदेहाची ओळख पटल्यानंतर काही तासातच आरोपींना अटक करण्यात आल्याचे भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी सांगितले. पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर व तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रवींद्र भोसले, रवींद्र चिप्पा, सचिन पवार, हर्षल शिंदे, गणेश शेंडे, विक्रम सावंत, आशिष गायकवाड, सचिन गाडे, जगदिश खेडकर, प्रसाद टापरे व संतोष खताळ यांनी ही कामगिरी केली आहे.