राजगुरूनगर (पुणे):खेड घाटात दोन दिवसांपूर्वी स्वप्निल सखाराम चौधरी या २७ वर्षीय युवकाचा खून झाला होता. या घटनेबाबत खेड पोलिसांनी या खुनाचा उलगडा केला असून दोन आरोपींना खेड पोलिसांनी अटक केली आहे. जुन्या भांडणाच्या कारणावरून खुन केला असल्याची कबुली दिली आहे.
निलेष उर्फ बाळया चांगदेव गायकवाड (वय २१ ), अमित उर्फ अमटया हिरामण चौधरी (वय २५ ) हे दोघे (रा.खरपुडी ता.खेड ) यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत स्वप्निल चौधरी व आरोपी हे मित्र होते. अमित उर्फ अमटया हिरामण चौधरी यांची पूर्वी स्वप्निल चौधरी यांच्याबरोबर भांडणे झाली होती. या भांडणाचा राग मनात धरुन आरोपींनी स्वप्निल चौधरी याला पुणे -नाशिक महामार्ग नवीन बाह्य वळण खेड घाटात दारु पिण्याच्या उद्शाने नेऊन त्याला डोक्याच्या पाठीमागे कोयत्याने गंभीर वार केले.
या घटनेत चौधरी यांचा जागीच मुत्यू झाला. या घटनेनंतर त्यांचा मृतदेह खोल दरीत टाकून दिला. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड, पोलिस हवालदार संतोष घोलप, स्वप्रील गाढवे, निखील गिरीगोसावी, सचिन जतकर, विशाल कोठावळे यांनी आरोपींना जेरबंद करीत खूनाचा उलगडा केला.