पुणे : दारू पिताना झालेल्या वादातून डोक्यात दगड घालून ठार केल्याची कबुली तरुणाने दिली आणि कात्रज भाजी मंडई परिसरात झालेल्या खुनाचा उलगडा झाला. भारती विद्यापीठ पोलिसांनी तरुणाला अटक केली.
किसन छगन मरगळे (वय २१, सच्चाई मााता मंदिर पाण्याच्या टाकीजवळ, कात्रज) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मनोहर बागल (वय ५५, रा. शिवशंभोनगर, कात्रज) असे खून झालेल्याचे नाव आहे. बागल बिगारी काम करत असत. शनिवारी (दि. १३) सकाळी कात्रज भाजी मंडई परिसरात एकाच्या डोक्यात दगड घालून ठार करण्यात आल्याचे उघडकीस आले होते. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर भारती विद्यापीठ पोलिसांनी तपास सुरू केला. बागल यांच्या मुलाने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली होती. बागल यांना ठार करून पसार झालेल्या आरोपीचा माग काढण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी केलेले चित्रीकरण ताब्यात घेतले.
बागल यांना ठार करून पसार झालेला मरगळे तळजाई जंगलात लपल्याची माहिती पोलिस कर्मचारी हर्षल शिंदे, सचिन गाडे, धनाजी धोत्रे यांना मिळाली होती. पोलिसांनी मरगळेला पकडले. दारू पिताना झालेल्या वादातून मरगळेने बागल यांचा खून केल्याची कबुली चौकशीत दिली. पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, गुन्हे शाखेचे निरीक्षक विजय पुराणिक, सहायक निरीक्षक गिरीश दिघावकर, उपनिरीक्षक धीरज गुप्ता, सचिन सरपाले, मंगेश पवार, नीलेश जमदाडे, अवधूत जमदाडे यांनी ही कारवाई केली.