पुणे : रागाच्या भरात पत्नीचा खुन केलेल्या पतीकडे करीत असलेल्या चौकशीतून पोलिसांना मिळालेल्या धाग्यावरुन हडपसर पोलिसांना फुरसुंगी येथील दीड वर्षापूर्वी झालेल्या खुनाची उकल करण्यात यश आले आहे.
हडपसर पोलिसांनी संतोष सहदेव शिंदे (वय २७, रा़ फुरसुंगी, मुळगाव चाकूर, जि़ लातूर) याला अटक केली आहे. संतोष शिंदे हा फुरसुंगी येथे अधूनमधून दारु पिण्यास जात असत. दशक्रियाविधी येथे नरसिंग विठ्ठल गव्हाणे (वय ६५, रा. जयभवानी चौक, फुरसुंगी) हाही तेथे गांजा व दारु पिण्यासाठी बसत होता. त्याला संतोष शिंदे येथे येणे आवडत नसे. तो त्याला तेथे बसून देत नव्हता. २९ डिसेंबर २०१९ रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिंदे हा तेथे दारु पिण्यास गेला असताना नरसिंग गव्हाणे हा अगोदरच आला होता. त्यांच्या भांडणे झाली. त्यात शिंदे याने तेथील विटेने व दगडाने मारहाण करुन गव्हाणे याचा खून केला होता. मात्र, हडपसर पोलिसांना दुसर्या दिवशी गव्हाणे याचा मृतदेह आढळून आला होता. परंतु, खून कोणी केला याचा तपास होऊ शकला नव्हता.
सागर बाळु लोखंडे (वय २३) याने ७ मार्च रोजी आपली पत्नी शुभांगी लोखंडे (वय २१) ही घरी येत नसल्याच्या कारणावरुन पत्नीला चाकूने भोसकून तिचा खून केला होता.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, सहायक निरीक्षक हनुमंत गायकवाड व इतर पोलीस अधिकारी सागर लोखंडे याचा पूर्वइतिहास जाणून घेत होते. शुभांगी याच्याबरोबर सागर याचे दुसरे लग्न होते. शुभांगी तिच्या पहिल्या नवर्याशी बोलत असल्याने त्याचा राग सागर याला येत होता. त्यावरुन दोघांमध्ये वाद होत होता. एकदा बोलता बोलता रागाच्या भरात शुभांगीने सागरला माझ्या नवर्याने यापूर्वी एक मर्डर केला आहे.
जर तू आमच्या दोघांमध्ये आलास तर तो तुला देखील संपवून टाकेन, अशी धमकी दिली होती. सागर याला शुभांगीच्या पहिल्या नवर्याचे संतोष इतकेच नाव माहिती होते. तो फुरसुंगीला राहत असल्याची माहिती होती.
पोलिसांनी शोध घेतल्यावर फुरसुंगी येथील दशक्रिया विधी येथे एका खुनाचा गुन्हा अद्याप उघड झाला नसल्याचे लक्षात आले. संतोष हा खून झाल्यानंतर फुरसुंगी येथे राहत नसल्याचे समजले. तो चिखली येथे बहिणीकडे राहायला गेल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी संतोष शिंदे याला ताब्यात घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात आणले. त्याच्याकडे चौकशी केल्यावर त्याने नरसिंग गव्हाणे यांचा खून केल्याचे कबूल केले.