कोरेगाव भीमा : येथील नरेश्वर वस्तीजवळील पाण्याच्या टाकीमध्ये पडलेल्या बेवारस मृतदेहाची ओळख पटल्याने त्याचा खून झाला असल्याचे सिद्ध झाल्याने या प्रकरणातील आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले कोरेगाव भीमा येथे नरेश्वर वस्तीजवळील वनक्षेत्रात पाण्याच्या टाकीमध्य मागच्या महिन्यात एका युवकाचा मृतदेह आढळला होता. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांनी केली होती. याचदरम्यान दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक युवक बेपत्ता झाला असल्याची फिर्याद त्याच्या पत्नीने दाखल केली होती. शिक्रापूर पोलिसांनी या व्यक्तीबाबत माहिती दिली होती. त्याअनुषंगाने तपास केला असता, मृत हा दौंडचा बेपत्ता युवक असल्याचे सिद्ध झाले. दौंड पोलिसांनी बेपत्ता इसमाच्या नातेवाइकांना शिक्रापूर पोलीस ठाण्यात आणले असता, त्याच्याजवळील साहित्यापासून ती व्यक्ती तोच असल्याने सिद्ध झाले. सचिन देविदास गोडसे (वय ३०, रा. पेडगाव, ता. दौंड) असे मृत युवकाचे नाव असल्याचे समजले. यांनतर नातेवाइकांकडे शिक्रापूर पोलिसांनी चौकशी केली असता सचिन गोडसे व नीलेश कोळस्कर यांच्यामध्ये पैशाच्या कारणावरून वाद झाला असल्याचे समजले. शिक्रापूर पोलिसांनी नीलेश सुरेश कोळस्कर (वय ३०, रा. पेडगाव, ता. दौंड) याला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर नीलेश याने सचिन देविदास गोडसे याच्यासोबत पैशाच्या कारणावरून वाद झाला होता. या कारणावरून नीलेशने त्याचा साथीदार रमेश यादव (रा. पेडगाव, ता. दौंड) याच्या साथीने सचिनला (कोरेगाव भीमा, ता. शिरूर) येथे आणून त्याला दारू पाजून येथील वनक्षेत्रात जाऊन नीलेश सोळस्कर व त्याचा साथीदार रमेश यादव यांनी सचिन गोडसे याला ठार मारून त्याचा मृतदेह तेथील पाण्याच्या टाकीत टाकून दिला असल्याची कबुली दिली.याबाबत पोलीस उपनिरीक्षक चेतन थोरबोले यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. नीलेश सुरेश कोळस्कर (वय ३०, रा. पेडगाव, ता. दौंड) व त्याचा साथीदार रमेश यादव (रा. पेडगाव, ता. दौंड) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्रापूर पोलिसांनी नीलेश सुरेश कोळस्कर याला अटक केली असून, रमेश यादवचा शोध शिक्रापूर पोलीस घेत आहेत. शिक्रापूर पोलीस पुढील तपास करीत आहे.
कोरेगाव भीमा येथे खुनाचा गुन्हा उघड
By admin | Published: October 11, 2016 1:49 AM