लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : लोहगाव परिसरात शनिवारी रात्री सराईत गुंड सुमीत जगताप याचा बेदम मारहाण करून निर्घृन खून करण्यात आला. या प्रकारानंतर पसार झालेल्या लेडी डॉन शबनम शेख हिच्यासह तीन जणांना पोलिसांनी अवघ्या तासाभरात बेड्या ठोकल्या.
सुमीत दिलीप जगताप (वय ३४, रा. कालवड वस्ती, लोहगाव) हे मृत गुंडाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध लोहगाव परिसरात मारामारी व सशस्त्र हल्ल्यांचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्या खूनप्रकरणी शबनम हनीफ शेख (वय ३५, रा. भुकनवस्ती, लोहगाव), महंमद हुसेन महंमद शरीफ कुरेशी (वय ३३) आणि सलीम मुर्तुजा शेख (वय ३२, सर्व रा. लोहगाव) यांना पोलिसांनी अटक केली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमीत जगताप हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील सराईत गुंड होता. त्याचे त्या भागात लेडी डॉन या नावाने परिचित असलेल्या शबनमशी जुने मैत्री संबंध होते. शबनमने या परिसरातील अवैध व्यवसायात जम बसवला होता. त्यातून उभयतांमध्ये नेहमी वादावादी होत असे. तो गेल्या काही महिन्यांपासून तिला सातत्याने त्रास देत होता. त्यावरून लोहगावमधील खेसे पार्क परिसरात शनिवारी (दि.३) रात्री आठच्या सुमारास उभयतांमध्ये जोरदार भांडणे झाली. त्यावेळी शबनम व तिच्या साथीदारांनी धारदार शस्त्रांचे वार करून व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण करून सुमीतचा निर्घृण खून केला.
खुनाचे वृत्त समजल्यावर सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव, विमानतळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार व त्यांचे सहकारी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सुमीतला त्यांनी ससून रुग्णालयात हलवले. तेथे डॉक्टरांच्या तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यु झाला. पोलिसांनी संशयितांची माहिती काढून वेगाने तपास हाती घेतला.
खुनाच्या घटनेनंतर अवघ्या तासाभरात आरोपी जेरबंद
शहर गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट चारचे पोलीस निरीक्षक रजनीश निर्मल, सहायक पोलीस निरीक्षक संदीप जमदाडे हे ही पथकासमवेत घटनास्थळी दाखल झाले. हवालदार गणेश साळुंखे, राकेश खुनवे यांना लेडी डॉन शबनम शेख व तिच्या साथीदारांचा ठावठिकाणा समाजला. त्यांनी खडकीतील शासकीय दूध योजना कार्यालयाच्या परिसरात छापा टाकून तिन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या. त्यांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. खुनाच्या घटनेनंतर अवघ्या तासाभरात आरोपींना जेरबंद केल्याबद्दल या पथकाचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले. दरम्यान, आरोपीना विमानतळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.