दौंड : वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीपणामुळे नुकत्याच प्रसुत झालेल्या बालिकेचा मृत्यु झाल्याचा आरोप करीत नातेवाईकांनी कुरकुंभ येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकाऱ्यास बेदम मारहाण केली़ डॉ़ सचिन येडके असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे़ मात्र, या प्रकरणी दोन्ही बाजूकडून कोणीही तक्रार दिली नसल्याचे दौंड पोलिसांनी सांगितले़ याबाबत मिळालेली माहिती अशी, किर्ती सांगळे (रा़ येडेवाडी, ता़ दौंड) यांना प्रसुतीसाठी कुरकुंभला सोमवारी सकाळी आरोग्य केंद्रात आणले होते. यावेळी डॉ. येडके यांनी महिलेची तपासणी करुन आरोग्य केंद्रात दाखल करुन घेतले. त्यानंतर ते निघुन गेले, ते थेट मंगळवारी सकाळी १० वाजता आरोग्य केंद्रात आले. आरोग्य केंद्रात रात्रभर एकच महिला कर्मचारी उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी रात्री किर्तीला मुलगी झाली. तेव्हा महिला कर्मचाऱ्यानी किर्तीच्या नातेवाईकांना सांगितले की जन्म दिलेली मुलगी रडली नाही. तिचा आवाज आला नाही, तेव्हा तुम्ही दौंडला खाजगी रुग्णालयात घेऊन जा़ संबंधित सिस्टरने डॉ. येडके यांना मोबाईल केला़ त्यांनी तो घेतला, पण ते रुग्णालयात आले नाही. त्यानंतर प्रसुत महिला आणि तिच्या मुलीला दौंडला दोन खाजगी रुग्णालयात आणले परंतु दवाखाने बंद होते. अन्य तिसऱ्या दवाखान्यात नेले, तेव्हा बालिका मृत झाली असल्याचे सांगण्यात आले. हे समजल्यानंतर तिचे नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले़ ते आज सकाळी कुरकुंभ प्राथमिक आरोग्य केंद्रात आले़ आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन येडके यांना ग्रामस्थांनी मारहाण केली़ दौंड शुगरचे जेष्ठ संचालक वीरधवल जगदाळे यांनी मध्यस्थ केल्याने पुढील अनर्थ टळला़ डॉ. सचिन येडके यांची तातडीने बदली करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. कुरकुंभच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दौंड शहर युवक राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजेश गायकवाड, दौंड कृषी उत्पन बाजार समितीचे माजी सभापती राहुल भोसले, माजी उपसरपंच सुनिल पवार, अजिनाथ लव्हे यांनी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. (वार्ताहर)
कुरकुंभला डॉक्टराला मारहाण
By admin | Published: February 10, 2015 11:52 PM