पुणे : जेवणाचे बिल देण्यावरून झालेल्या वादातून जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या नातेवाइकाचा खून करून मृतदेह बोपदेव घाटात टाकल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने एकाला अटक केली आहे. किरण भागवत थोरात (वय २६, रा. बिबवेवाडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. धनंजय हरिदास गायकवाड (२३, रा. कोंढवा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी हरिदास गायकवाड (५०, रा. कोंढवा) यांनी कोंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. धनंजय गायकवाड व किरण थोरात हे नातेवाईक आहेत. त्यांच्यामध्ये पैशांवरून भांडणे झाली होती. त्यावरून धनंजय किरणला जिवे मारण्याची धमकी देत होता. धनंजय १२ डिसेंबरला दारू पिऊन किरणच्या घरी आला. त्यांच्या आईला शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली. घरावर दगडफेक केली. तेव्हा किरण याने त्यास गोड बोलून झाले गेले विसरून जा, मी तुला पैसे देतो, दारू पाजतो, असे म्हणून त्याच्या दुचाकीवरून दारू घेऊन त्याला बोपदेव घाटाच्या शेवटच्या टोकाला नेले.
तेथे त्याला दारू पाजली. तेव्हा त्याने किरण याला व त्यांच्या तीन महिन्यांच्या मुलीला मारून टाकेन, अशी धमकी देऊन पाठीत दगड मारला. तेव्हा किरण याने तो दगड उचलून त्याच्या डोक्यात घातला. तो खाली पडल्यावर त्याच दगडाने डोक्यात, छातीवर घाव घालून खून केला. तेथून त्याला ओढत दरीत ढकलून दिले. त्याची गाडीही ढकलून दिली. कोंढवा पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. किरण थोरात हा चिंचवड येथे लपला असल्याची माहिती मिळाल्यावर गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने त्याला पकडले.