पुणे : गर्भवती मामीचा खून केल्याच्या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने आरोपी पोलिस कॉन्स्टेबल महिलेला ३० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. सदर महिला कॉन्स्टेबल गेल्या नऊ वर्षांपासून कारागृहात आहे.
आरोपी महिला एका पोलिस स्टेशनमध्ये पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होती. मयत गर्भवती महिला सुमारे दोन वर्षांपासून उरुळी कांचनमधील इमारतीत भाड्याने राहत होती. आरोपी महिला त्यांची भाची असून तीसुद्धा याच इमारतीमध्ये वास्तव्यास होती. १४ जुलै २०१५ रोजी आरोपीच्या बाथरूममध्ये तिची मामी मृत अवस्थेत आढळली.
या प्रकरणात आरोपी महिलेला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाविरोधात आरोपी महिलेने ॲड. अनिकेत निकम यांच्यामार्फत अपील व जामिनासाठी मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता. ही घटना परिस्थितीजन्य पुराव्यावर आधारित आहे आणि खुनाचे कारण शेवटपर्यंत सिद्ध झालेले नाही. अद्याप उच्च न्यायालयाच्या अपिलाचे कामकाज सुरू झालेले नाही, त्यामुळे जामीन मंजूर करण्यात यावा, असा युक्तिवाद ॲड. निकम यांनी मुंबई उच्च न्यायालयातील द्विसदस्यीय खंडपीठापुढे केला. ॲड. अनिकेत निकम व सरकारी वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीस जामीन मंजूर केला.