दावडी :खेड तालुक्याच्या पूर्व भागातील सेझ प्रकल्पातील कंपन्यांमधील व्यावसायिक स्पर्धा व ठेकेदारीतून कनेरसर (ता. खेड ) येथील ग्रामपंचायत सदस्याचा खून झाल्याची घटना शुक्रवारी घडली. संतोष रामदास दौंडकर (वय ३५, रा. कनेरसर, ता. खेड ) असे खून झालेल्या ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.
खेड तालुक्यातील कनेरसर येथील सेझमधील कंपन्यांमध्ये मयत संतोष दौंडकर हा क्रेन पुरविण्याचा व्यवसाय करीत होता. गेल्या वर्षभरात संतोष दौंडकर याने आपल्या व्यवसायाचे चांगलेच बस्तान बसविले होते त्याच स्पर्धेतून संतोषच्या खुनाचा प्रकार घडला असावा असे बोलले जाते. दि ६ रोजी सायंकाळच्या सुमारास कंपनी जवळ असताना अज्ञातांनी धारदार हत्याराने संतोषवर वार केले. यावेळी प्रतिकार करत असताना उजव्या हाताचा पंजा तुटून जागेवर पडला. यावेळी जीव वाचविण्यासाठी पळत जात असताना हल्लेखोरांनी पाठलाग करून तोंडावर, डोक्यावर अनेक वार केले. यामध्ये मयत संतोष याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेचा पुढील तपासासाठी पोलिसांची पथके तयार केली असल्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांनी सांगितले.
सेझ मधील कंपन्यांचा वाढता विस्तार त्यात मिळणाऱ्या ठेकेदारीवरुन होणारे वाद आणि यापूर्वीच्या गंभीर घटना लक्षात घेता ग्रामस्थांकडून परिसरात कायमस्वरुपी पोलिस चौकीची मागणी केली होती. मात्र याकडे अद्यापपर्यंत दुर्लक्ष झालेले आहे.