पुणे : चारित्र्याचा संशय घेऊन पत्नीचा खून केला. त्यानंतर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींनी बायकोचा खून केल्याची फिर्याद दिली. मात्र, पोलिस तपासात खरा प्रकार समोर आला आणि फिर्याद देणारा नवराच खुनाचा मुख्य आरोपी असल्याचे निष्पन्न झाले. नवऱ्यानेच पत्नीला शॉक देऊन तसेच गळा आवळून खून केल्याचे तपासात उघडकीस आले.
शीतल स्वप्नील रणपिसे (२३, रा. रांजणगाव सांडस, ता. शिरुर, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. याप्रकरणी तिचा पती स्वप्नील शामराव रणपिसे (२६) याला अटक करण्यात आल्याची माहिती ग्रामीण पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. याप्रकरणी शिरुर पोलिस ठाण्यात गुन्हा खुनाचा दाखल करण्यात आला होता. स्वप्नील उच्चशिक्षित आहे. त्याचे सात महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते. यापूर्वी देखील लग्नासाठी मुली बघत असताना संशयी स्वभावाचा स्वप्नील मुलींकडे तो त्यांच्या यापूर्वीच्या आयुष्याबाबत चौकशी करत असायचा. त्याच्या याच स्वभावामुळे त्याला तरुणींनी लग्नास नकार दिला होता असे देखील देशमुख यांनी सांगिले.
शीतल ३ जुलै रोजी घरात एकटी होती. त्यावेळी सासरे शामराव, स्वप्नील आणि सासू शारदा कामानिमित्त बाहेर गेले होते. स्वप्नीलच्या आईचे रांजणगाव सांडस परिसरात साडीचे दुकान आहे. दुपारी दोनच्या सुमारास स्वप्नील घरी आला. तेव्हा दरवाजा बंद होता. त्याने शीतलच्या मोबाइलवर संपर्क साधला. तेव्हा तिने प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे त्याने चुलतभाऊ रणजितला बोलवून घेतले. घराच्या पाठीमागील दरवाजाने दोघेजण आत गेले. तेव्हा शीतल घरात बेशुद्धावस्थेत पडली होती. तिच्या गळ्याजवळ दोरी गुंडाळली होती. तिच्या अंगठ्याला इलेक्ट्रिक वायरने शॉक दिला होता. शीतलला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासून मृत्यू घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. घरातील सामान अस्ताव्यस्त पडले होते. शीतलचा खून चोरीचा उद्देशातून झाल्याची प्राथमिक माहिती तपासात उघडकीस आली होती. नवविवाहित तरुणीचा खून झाल्याने पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांनी तपासाबाबत सूचना दिल्या होत्या. पोलिसांनी घराच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेतले होते. सर्व शक्यता गृहित धरून पोलिसांनी तपास सुरू केला. स्वप्नीलने पोलिसांकडे फिर्याद दिली. पोलिसांनी त्याची चौकशी सुरु केली. उच्चशिक्षित असलेला स्वप्नील पोलिसांना माहिती दिली. तपासात त्याच्यावरचा संशय बळावला. पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा चारित्र्याच्या संशयातून त्याने पत्नीचा खून केल्याची कबुली दिली.
ही कामगिरी पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त अधीक्षक रमेश चोपडे, शिरूरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे, सहायक निरीक्षक राहुल गावडे, अमोल पन्हाळकर, उपनिरीक्षक एकनाथ पाटील, हवालदार सचिन घाडगे, अजित भुजबळ, अतुल डेरे, राजू मोमीन, तुषार पंदारे यांच्या पथकाने केली.