येरवडा: दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या वादातून येरवड्यातील तीन सराईत गुन्हेगारांनी एका परप्रांतीय तरुणाचा दोन वर्षांपूर्वी निर्घुण खून केला होता. या अनोळखी परप्रांतीय तरुणाच्या खून प्रकरणी येरवडा पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता. मिळालेल्या गोपनीय माहितीवरून गुन्ह्यातील आरोपींना येरवडा पोलिसांनी नुकतीच सापळा रचून अटक केली.
याप्रकरणी कुणाल जाधव उर्फ राजा (रा. खराडी, पुणे) व राकेश भिसे उर्फ गंद्या (रा. लक्ष्मीनगर येरवडा) या दोघांना अटक करण्यात आली असून या गुन्ह्यातील आरोपी निखिल यादव उर्फ एनवाय हा येरवडा कारागृहात आहे. येरवड्यातील या तीन सराईत गुन्हेगारांनी हा खून केला होता.
25 मे 2009 रोजी येरवडा येथील डॉन बॉस्को हायस्कूल शाळेच्या मागील मोकळ्या मैदानात कचराकुंडी मध्ये एका अनोळखी तरुणाचा गादिमध्ये गुंडाळलेला गंभीर जखमी अवस्थेतील मृतदेह मिळून आला होता. मृत तरुणाची ओळख न पटल्यामुळे याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अनोळखी आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्याच्या तपासात खून झालेल्या परप्रांतीय तरुणाची ओळख न पटल्यामुळे तपासात अडचणी येत होत्या.
येरवडा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक समीर कर्पे व पोलीस नाईक अहमद शेख यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदरचा खुनाचा गुन्हा हा येरवडा पोलीस स्टेशनच्या पूर्व रेकॉर्डवरील सराईत आरोपी कुणाल जाधव, राकेश भिसे व निखिल यादव यांनी केल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार कुणाल व राकेश या दोघा आरोपींना सापळा रचून ताब्यात घेण्यात आले.
अधिक तपासात तिघांनी सदर परप्रांतीय तरुणाचा दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या वादातून त्यांचा मित्र देवा (रा. बर्मासेल, लोहगाव) याचा खून केल्याची कबुली दिली. खुनाचा गुन्हा करून आरोपी फरार झाले होते.
खून झालेल्या तरुणाची ओळख पटवण्यासाठी कुठलाही पुरावा नसताना येरवडा पोलिसांनी केलेल्या कौशल्यपूर्ण तपासातून दोन वर्षांपूर्वी झालेल्या परप्रांतीय तरुणाच्या खुनाचा गुन्हा उघडकीस आला आहे.
सहाय्यक पोलीस आयुक्त किशोर जाधव, येरवडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युनुस शेख, गुन्हे निरीक्षक अजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक समीर कर्पे, सहाय्यक फौजदार प्रदीप सुर्वे बाळासाहेब गायकवाड पोलीस हवालदार गणपत कोळे नाईक अहमद शेख, तुषार खराडे, नवनाथ मोहिते, विनायक साळवी यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला.