लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : तडीपार गुंडाकडून मध्यरात्री पोलीस हवालदाराचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी तडीपार गुंडाला अटक केली आहे. बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीजजवळ मध्यरात्री सव्वाबारा वाजता हा प्रकार घडला.
पोलीस हवालदार समीर जमील सय्यद (वय ४८, रा. खडक पोलीस वसाहत, शुक्रवार पेठ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी गुंड प्रवीण श्रीनिवास महाजन (वय ३६, रा. कसबा पेठ) याला अटक करण्यात आली.
याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सय्यद फरासखाना पोलीस ठाण्यात नेमणुकीस होते. बुधवारी शहरात बंदोबस्त असल्याने बंदोबस्ताचे वाटप केल्यानंतर मध्यरात्री सय्यद हे खडक पोलीस वसाहत येथील घरी जाण्यासाठी निघाले होते. श्रीकृष्ण चित्रपटगृहाजवळ अहिर हॉटेलसमोर सय्यद यांना महाजन याने अडवले. सय्यद आणि महाजन यांच्यात यावेळी वाद झाला. तेव्हा महाजन याने आपल्याकडील चाकू काढून सय्यद यांच्यावर वार करण्यास सुरुवात केली.
महाजन याने त्यांच्या मानेवर, पोटावर, छातीवर वार केले. त्यातील एक वार गळ्यावर लागल्याने त्यातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव होत होता. याची माहिती तेथील नागरिकांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविली. त्यावेळी गस्तीवर असलेले पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. तेथे समीर सय्यद हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. त्यांच्याकडे विचारपूस केल्यावर त्यांनी पव्या महाजनने मारल्याचे सांगितले. पोलिसांनी तातडीने रस्त्याने जाणाऱ्या एका रुग्णवाहिकेला थांबवून त्यातून सय्यद यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने केईएम रुग्णालयात आणले. सय्यद यांच्यावर औषध उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे, पोलीस निरीक्षक राजेश तटकरे यांनी घटनास्थळाला भेट दिली.
महाजन यांच्याविरुद्ध किमान १० गंभीर गुन्हे असून त्याला दोन वर्षापूर्वी तडीपार केले आहे. पोलिसांनी प्रवीण महाजन याला अटक केली आहे. सय्यद आणि महाजन यांच्यात वाद झाला. त्यातून सय्यद यांचा खून झाल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र लांडगे यांनी सांगितले. मात्र, खडक पोलीस वसाहतीला जाण्यासाठी शिवाजी रोडवरुन सरळ रस्ता असताना समीर सय्यद हे इतक्या रात्री श्रीकृष्ण टॉकीजजवळ का गेले होते, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.