लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : बहिणीशी असलेल्या प्रेमसंबंधाचा राग मनात धरून तिच्या प्रियकरालाच मारण्याचा कट भावाने रचला. मात्र हा डाव फसल्याने प्रियकरानेच त्याचा वचपा काढत आपल्याला मारण्याचा कट आखणाऱ्या प्रेयसीच्या भावाचीच मित्राच्या मदतीने दगडाने ठेचून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी अवघ्या १२ तासांच्या आत या खुनाचा उलगडा करत तिघांना अटक केली. अमर महाडिक (वय २३) असे खून झालेल्याचे नाव आहे. निखिल ऊर्फ बंटी बाळासाहेब बिबवे (वय २४, रा. बिबवेवाडी), राधिकेश शिवाजी पवार (वय २२, स्टेट बँकनगर सोसायटी, रा. बिबवेवाडी) आणि रवी ज्ञानेश्वर बोत्रे ( वय २0, रा. लेक टाऊन एसआरए कॉलनी, भारती विद्यापीठ) या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.काही दिवसांपूर्वी कात्रज परिसरातील नॅन्सी लेक सोसायटीच्या मागे टेलिफोन भवनच्या समोर दगडाने ठेचून तरुणाचा खून केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याचा तपास सुरू केला. या मृतदेहाचा चेहरा कुत्रे व डुकरांनी खाल्यामुळे त्याची ओळख पटविणे पोलिसांना अवघड झाले होते. या प्रकरणाचा तपास करताना या तरुणाचे नाव अमर महाडिक असल्याचे पोलिसांना कळाले. वेगवेळ्या ठिकाणांवरून तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, राधिकेशचे अमरच्या बहिणीसोबत प्रेमसंबंध होते, परंतु, त्याने लग्नाला नकार दिला. त्याचा राग अमरला असल्याने त्याने राधिकेशला दारू पाजून त्याचा खून करण्याचा कट रचला. याबाबत त्याने निखिलला सांगितले होते. परंतु, निखिल हा राधिकेशचा जवळचा मित्र असल्याने त्याने याबाबत त्याला सांगितले. त्या वेळी त्यांनी अमरला दारू पाजण्यासाठी घेऊन गेल्यानंतर आपणच त्याचा काटा काढायचा असे ठरले. त्यानुसार बुधवारी रात्री अमर हा राधिकेश, निखिल आणि आणखी एक जण असे चौघे दारू पिण्यासाठी नॅन्सीलेक सोसायटीच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत गेले. त्या वेळी त्यांच्यामध्ये वाद होऊन या तिघांनी अमरच्या डोक्यात, चेहऱ्यावर दगडाने व सिमेंटच्या ब्लॉकने घाव घालून त्याचा खून केला.
प्रेयसीच्या भावाची हत्या
By admin | Published: July 01, 2017 7:55 AM