पुणे : भाजी आणण्यासाठी कोणी पैसे द्यायचे या कारणावरुन झालेल्या भांडणाच्या रागातून मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खुन करण्याची घटना उघड झाली आहे़. किरण काटकर (वय २८, रा़ येवलेवाडी ता़ हवेली) असे खुन झालेल्या कामगाराचे नाव आहे़. नऱ्हे येथील अभिनव कॉलेज मार्गावरील स्वराज डेव्हलपर्स बांधकाम साईटवरील पत्र्याच्या शेडमध्ये ही घटना दरम्यान घडली़. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
पप्पु पाटील (वय २८) असे आरोपीचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, किरण काटकर आणि पप्पू पाटील हे दोघे एकमेकांचे मित्र होते़ ते बांधकाम साईटवरील पत्र्याच्या शेडमध्ये एकत्र रहात होते़. सोमवारी त्यांच्या भाजी आणण्यासाठी पैसे कोण देणार यावरुन भांडणे झाली होती़. त्यानंतर काटकर याने आपला नातेवाईक आत्माराम जाधव यांना बोलावून घेतले़. तेव्हा ही भांडणे मिटवण्यासाठी जाधव यांनी १०० रुपये दिले चिकन आणण्यास सांगितले. मात्र पप्पु पाटील हा चिकनऐवजी अंडी घेऊन आला़. त्यावरुन पुन्हा भांडणाला सुरुवात झाली आणि रागाच्या भरात काटकर याने पप्पूला मारले़. तेव्हा त्याने बघुन घेण्याची धमकी दिली़. त्यानंतर तिघेही न जेवता झोपी गेले़.
जाधव हे सकाळी सहा वाजता उठून प्रातर्विधीसाठी बाहेर गेले असताना पप्पू पाटील याने झोपलेल्या काटकर याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खुन केला व तो पळून गेला़. या प्रकरणात पोलीस उपायुक्त मंगेश शिंदे, सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख, बाजीराव मोहिते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सरदार पाटील, पोलीस निरीक्षक संगीता यादव, आदींनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप तपास करत आहेत.