लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे/धनकवडी : चारित्र्याच्या संशयावरून प्रेयसीचा चाकूने गळा चिरून खून केल्याची घटना कात्रज नवीन बोगदा परिसरात घडली.
सपना दिलीप पाटील (वय ३२, रा. धनकवडी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिचा प्रियकर राम गिरी (वय ३२, रा. परभणी) याला अटक केली आहे.
याबाबत संजीवनी दत्ता देवकर (वय २९, रा. धनकवडी) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपना पाटील या विवाहित होत्या. मात्र सध्या त्या पतीपासून वेगळ्या धनकवडीतील बालाजीनगर परिसरात बहिणीसोबत राहत होत्या. एका खासगी कंपनीत त्या हाऊसकिपिंगचे काम करीत होत्या. तर राम हा हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतो. गेल्या ८ वर्षापासून राम आणि सपना या दोघांचे प्रेमसंबंध होते. परंतु गेल्या काही दिवसांपासून गिरी हा सपनाच्या चारित्र्यावर संशय घेत होता. सपना तिच्या मित्रासोबत बोलते याबाबत त्याच्या मनात चीड होती. रविवारी सायंकाळच्या सुमारास राम हा सपना काम करत असलेल्या मॉलजवळ आला. जेवण्यासाठी जाण्याचा बहाणा करून त्याने सपनाला बरोबर घेतले. मित्राच्या कारमधून तिघे नवीन कात्रज बोगद्याकडून साताऱ्याकडे जाणाऱ्या रोडने निघाले होते. गाडीच्या मागील सीटवर सपना आणि राम बसले होते. दोघांत वाद सुरू झाले. राम याने मद्यप्राशन केले होते. मॉलजवळून त्याने एक चाकू घेतला होता. वादातून राम याने सपनाच्या गळ्यावर सपासप वार केले. हा प्रकार पाहून राम याचा मित्र गाडीचालक घाबरला. त्याने गाडी थांबवून काय झाले हे पाहिले. त्यावेळी सपनाच्या गळ्यावर राम याने वार केल्याचे दिसून आले. राम याने केलेल्या हल्ल्यात सपना गंभीर जखमी झाली होती. राम गाडीतून उतरून पळून गेला. त्याच्या मित्राने सपनाला नजीकच्या रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचारादम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
सपनाचा खून केल्यानंतर गिरी पसार झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सागर पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त सुषमा चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक विजय पुराणिक यांनी घटनास्थळी भेट दिली व आरोपीचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने आरोपीचा माग काढून त्यास ताब्यात घेण्यात आले असून खुनातील चाकू जप्त करण्यात आल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलीसांनी दिली आहे. याबाबत पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कवठेकर करत आहे.