पुणे : डेक्कन पोलीस ठाण्यासमोरील गरवारे प्रशालेत मध्यरात्री मद्यपान करत बसलेल्या मित्रांमध्ये झालेल्या वादातून तरुणाचा खून करण्यात आला.
राजन रमेश सहानी (वय २७, रा. वारजे नाका) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी किसन प्रकाश वरपा (वय २१, रा. श्रमिक वसाहत, कर्वे रोड) याला अटक केली आहे.
याबाबत डेक्कन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर करपे यांनी माहिती दिली. राजन पेटिंगचे काम करतो. राजन आणि किसन दोघांनाही मद्यपानाचे व्यसन आहे. किसन काहीही कामधंदा करीत नाही़ रविवारी दुपारी दोघेही दारु पिण्यासाठी अड्ड्यावर आले होते. तेथून ते सिंहगडावर गेले. तेथे त्यांनी मद्यपान केले. रात्री उशीर झाल्याने किसन हा राजनला घेऊन गरवारे शाळेत आला. किसन हा तेथेच शिकला असल्याने रात्री उशीर झाल्यावर तो कंपाऊंडवरून उडी मारून येथील आवारात झोपत असे. त्याप्रमाणे दोघेही कंपाऊंडवरून उडी मारून आत आले. दुसऱ्या मजल्यावरील आवारात त्यांनी पुन्हा मद्यपान केले. त्यावेळी त्यांच्यात वाद झाला. राजनने जवळच पडलेले फावडे किसनच्या हातावर मारले. त्यामुळे किसन याने फायर सेफ्टीचा लाल डबा काढून राजनच्या डोक्यात घातला. वर्मी घाव बसल्याने राजन जागेवरच निपचित पडला. त्यानंतर किसन याने त्याला ओढत एका वर्गात नेले. तेथे पुन्हा त्याला मारहाण केली. त्यानंतर तो सकाळ झाल्यावर घरी निघून आला.
राजन घरी न आल्याने त्याच्या नातेवाईकांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मंंगळवारी दुपारी त्यांनी वारजे पोलिसांकडे बेपत्ता असल्याची तक्रार दिली. दरम्यान, किसन हा बुधवारी पहाटे पुन्हा गरवारे प्रशालेत आला. दुसऱ्र्या मजल्यावरील वर्गामध्ये गेला. तेव्हा त्याला राजनचा मृतदेह तेथेच पडलेला दिसून आला. त्यानंतर तो डेक्कन पोलीस ठाण्यात आला. त्याने स्वत: पोलिसांना मला अटक करा, मी मित्राचा खून केला असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी गरवारे शाळेत जाऊन खात्री केली. तेव्हा तेथे राजन याचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून किसन वरपा याला अटक केली. कोरोनामुळे सध्या शाळा बंद आहे. जर आरोपीने येऊन सांगितले नसते तर, खुनाचा प्रकार उघडकीस येण्यास वेळ लागला असता.