या प्रकरणी मनोज निंबाळकर (वय २४, रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर), सतीश भोसले (वय ३३, रा. वरवंड, ता. दौंड) या दोघांना अटक करण्यात आली आहे तर सागर दाभाडे (रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर) हा आरोपी फरार झाला आहे. त्याचा पोलीस शोध घेत आहे. तर या घटनेत प्रशांत निंबाळकर (वय २४, रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. दरम्यान, घटना घडल्यानंतर पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांच्या सतर्कतेने तब्बल ३३ दिवसांनी या खूनाला वाचा फुटल्याने आरोपी जेरबंद झाले.
१ मार्च रोजी प्रशांत निंबाळकर हा गणेगाव दुमाला येथून प्रशांत निंबाळकर सोबत दुचाकीवरून भुलेश्वर येथे देवदर्शनाला गेले होते. त्यानंतर सतीश भोसले, सागर दाभाडे, प्रशांत निंबाळकर, मनोज निंबाळकर हे रात्री पाटस येथे एकत्रीत एका ढाब्यावर दारू पिण्यास आले. यावेळी या चौघात जोरदार भांडण झाले. प्रशांतला या तिघांनी पाटस येथील उड्डाणपुलाच्या पायथ्याशी आणनू अंधाराचा फायदा घेत बेदम मारहाण केली. साधारणता १५ मिनिटे प्रशांतला मारहाण झाल्याने जवळजवळ तो अर्धमयत झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर यातील दोघा आरोपींनी त्याची दुचाकी घेऊन त्याच्यासह एकाच दुचाकीवर रात्री डिकसळ (ता. इंदापूर) येथील भीमानदीच्या पुलावर नेले. त्याचे हातपाय बांधून त्याला नदीपात्रात ढकलून दिल्याने प्रशांतचा मृतदेह खानवटा (ता. दौंड) येथे भीमा नदीपात्रात सापडला होता. मृतदेहाच्या अंगावर कुठेही जखम नाही. मात्र हातपाय बांधून फेकल्याने या मृतदेहाबाबत साशंकता वाढली होती. घटनास्थळी ग्रामीण पोलीस अधिक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, पोलीस उपअधीक्षक मयूर भुजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस, पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी भेट दिली होती.
दरम्यान पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी या गुन्ह्याचा तपास करून पोलिसांचे पथक कार्यरत केले. यवत पोलीस स्टेशनमध्ये या घटनेसंदर्भात प्रशांत निंबाळकर हा युवक हरवला असल्याची तक्रार होती. मयत युवकाच्या अंगावरील कपड्याच्या कंपनी मार्कच्या सहाय्याने तपास सुरू झाला. परिणामी गणेगाव दुमाला येथून एक युवक एक महिन्यापासून बेपत्ता झाला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार मयताच्या भावाला त्याचे कपडे व फोटो दाखवले असता यावेळी मयताची ओळख पटली आणि पुढील तपासातून पोलिसांनी आरोपी आणि घटनाक्रम शोधल्याने ३३ दिवसांत हा गुन्हा उघडकीस आला.
तपासी पथकात पोलीस निरीक्षक सचिन पाटील, सहायक पोलीस अधिकारी हृषीकेश अधिकारी, दिलीप भाकरे, आसीफ शेख, पांडुरंग थोरात, सचिन बोराडे, अण्णासाहेब देशमुख, अमोल गवळी, अमोल देवकाते, नारायण वलेकर, आदेश राऊत, रवी काळे, किरण ढुके यांचा समावेश होता.
आरोपी सरार्इत गुन्हेगार
या खुनातील आरोपी मनोज निंबाळकर, सागर दाभाडे, सतीश भोसले हे सर्राइत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद आहे.
गणेगाव दुमाला येथील एका युवकाच्या खुनातील आरोपींसह पोलीस अधिकारी