पुणे : शहरात एका बाजूला लॉकडाऊन सुरु असताना बिबवेवाडी येथे दोन गटातील अनेक जण एकत्र येतात. त्यातून मध्यरात्रीच्या सुमारास १० जण मिळून एका गुंडावर सपासप वार करुन त्याचा निर्घुण खुन केल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे ही घटना मध्यरात्री दीड वाजता बिबवेवाडी पोलीस चौकीसमोरील डॉ. आनंद पंडीधर यांच्या सरोजनी क्लिनिकसमोर घडली.
माधव हनुमंत वाघाटे (वय २८, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे खुन झालेल्या गुंडाचे नाव आहे़ याप्रकरणी त्याचा मित्र सिद्धार्थ संजय पलंगे (वय २१, रा. बालाजीनगर, धनकवडी) याने बिबवेवाडी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार सावन गवळी, आबा ढावरे, सुनिल घाटे, पवन गवळी व इतर पाच ते सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.माधव वाघाटे हा सहकारनगर पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. माधव याचा मित्र सुनील खाटपे याने माधवला फोन करुन माझे भांडण झाले आहे. मी बिबवेवाडी येथील ओटा स्कीमजवळ असल्याचे सांगितले. त्यानुसार माधव व फिर्यादी सिद्धार्थ पलंगे हे दोघे मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास बिबवेवाडी चौकीच्या समोर सुनील याची वाट पहात थांबले होते. यावेळी तेथे सावन गवळी व इतर १० जण आले. त्यांनी लाकडी बांबु, दगड, लोखंडी रॉडसारख्या हत्याराने व ट्युबलाईटने माधव वाघाटे याच्या तोंडावर व डोक्यावर वार करुन त्याचा खुन केला. त्यानंतर हे टोळके पळून गेले.
या घटनेची माहिती समजल्यानंतर पोलीस उपायुक्त नम्रता पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली असून तपासाच्या सूचना दिल्या आहेत. बिबवेवाडी पोलीस अधिक तपास करीत आहेत.