दौंड : गोवा एक्स्प्रेसमध्ये पिण्याच्या पाण्यावरून दोन युवकांमध्ये झालेल्या भांडणातून एका युवकाचा खून झाल्याची घटना मंगळवार (दि. १५) रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असल्याची माहिती दौंड रेल्वे पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे यांनी दिली. याप्रकरणी नितीन जाधव (वय २१, रा. गोंदणवणी, नेहरुनगर, श्रीरामपूर) याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. तर गजानन राठोड (वय ३३, रा. खानापूर, सावरगाव, ता. हिंगोली) या युवकाचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मनमाडकडून पुण्याकडे जाणारी गोवा एक्स्प्रेस उशिरा धावत असल्यामुळे पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ही रेल्वे गाडी दौंड स्टेशनला आली. सदरचे दोन्ही युवक जनरल बोगीतून प्रवास करीत होते. दरम्यान, गजानन राठोड याने नितीन जाधवकडे पिण्यासाठी बाटलीतील पाणी मागितले. नितीनने पाणी दिले नाही, या कारणावरून गजाननने नितीनच्या कानफटात मारल. परिणामी दोघांचे भांडण सुरू झाले. हे भांडण आणि हाणामारी दौंड ते पाटस दरम्यान सुरू होती. त्यानंतर केडगाव स्टेशन येण्याच्या अगोदर गजाननला नितीनने रेल्वे डब्यातील स्वच्छतागृहाजवळ आणले आणि चालू गाडीतून त्याला ढकलून दिले. रेल्वेगाडी केडगाव स्टेशन जवळ येत असताना नितीनने रेल्वे, डब्याची चेन ओढली. परिणामी गाडी केडगाव रेल्वे स्थानकात गाडी थांबताच डब्यातून चेन ओढलेल्या डब्यातून शिट्टी वाजली. यावेळी रेल्वे स्थानकात गस्तीवर असलेले रेल्वे सुरक्षा बलाचे जवान विठ्ठल भोसले शिट्टी वाजलेल्या रेल्वे डब्याजवळ गेले असता या डब्यातून संशयास्पदरीत्या नितीन उतरत असताना त्याला सुरक्षा जवानाने पकडले. त्याने गजाननला गाडीतून ढकलून दिल्याची कबुली दिल्यानुसार त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक युवराज कलकुटगे अधिक तपास करीत आहे.