पुणे : उसने दिलेले पैसे घेण्यास आलेल्याचा खून करुन कात्रज, धनकवडी परिसरात दहशत माजविणारा गुंड सोमनाथ कुंभारसह दोघांवर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी मोक्का कारवाई केली. सोमनाथ अशोक कुंभार (वय २८, रा. टेल्को कॉलनी, दत्तनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव) आणि रोहित दिलीप पाटेकर (वय २०, रा. गणेश चौक, धनकवडी) अशी मोक्का कारवाई झालेल्या दोघांची नावे आहेत.
सोमनाथ कुंभार याने १० हजार रुपये उसने घेतले होते. ते परत मागितल्यावर त्याने ज्येष्ठ नागरिकांच्या डोक्यावर, गळ्यावर व शरीराचे इतर भागावर वार करुन त्यांचा खून केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सोमनाथ कुंभार हा प्रत्येक गुन्ह्यात काही सामाईक व काही नवीन साथीदारांना सोबत घेऊन स्वत:ची संघटित टोळी तयार करुन गंभीर स्वरुपाचे गुन्हे केले आहेत. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, विनयभंग, दंगा, दुखापत करणे, बेकायदेशीर हत्यारजवळ बाळगणे यासारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड, निरीक्षक विजय पुराणिक, गिरीश दिघावकर, सहायक निरीक्षक कुलदीप व्हटकर व त्यांच्या सहकार्यांनी मोक्का कारवाईचा प्रस्ताव पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्फत अपर पोलिस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांना पाठवला. पाटील यांनी त्याला मान्यता दिली. पोलिस आयुक्त रितेशकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली ही ९२ वी मोक्का कारवाई आहे.