चाकण : प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला पत्नीने प्रियकराच्या मदतीने डोक्यात लाटण्याने जबर मारहाण करून गंभीर जखमी झालेल्या पतीचे पाय पत्नीने धरून प्रियकराने सुरीने पोटावर आणि गळ्यावर वार करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकरावर महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अजयकुमार सिंग (वय.२८, सध्या रा. सावरदरी, ता. खेड) याने दिलेल्या फिर्यादीवरून सचिनकुमार उपेंद्र राजभर (वय २३, मूळगाव जतपुरा, थाना राजपूर, जि. बक्सर) याच्यासह एका महिलेवर गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औद्योगिक वसाहतमधील सावरदरी (ता. खेड) येथे फिर्यादी अजय कुमार सिंग हा आपल्या पत्नीसोबत राहत आहे. फिर्यादीची पत्नी आणि आरोपी सचिन कुमार राजभर यांचे प्रेमप्रकरण असल्याने प्रेमात अडसर ठरणाऱ्या पतीला (दि. १७ ) रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास दोघांनी मिळून संगनमत करत अजय सिंग यास जिवे मारण्याच्या उद्देशाने दोघांनी हाताने मारहाण करत लाटण्याने डोक्यात मारून गंभीर जखमी केले. ’तुमको जानसे मार देंगे” असे बोलून, पत्नीने आपल्या पतीचे दोन्ही पाय धरून सचिन राजभर याने त्याच्या हातातील सुरीने फिर्यादीच्या पोटावर, हातावर, पाठीवर वार करत गळ्यावर सुरीने वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला.