रोहित रघुनाथ घोडके (वय १९, रा. खराबवाडी, ता. खेड) असे या खुनी हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याबाबत त्यांनी महाळुंगे पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार खराबवाडी येथील सोन्या दौंडकर (रा. खराबवाडी), अक्षय जोगदंड दरेकर (रा. राणूबाईमळा, पूर्ण नाव निष्पन्न नाही) व आणखी एक अनोळखी इसम यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी रोहित घोडके हे मजुरीचे काम करतात. मंगळवारी रात्री सातच्या सुमारास ते घरी असताना, ते राहत असलेल्या त्यांच्या गल्लीत मोठमोठ्याने आरडाओरडा झाल्याचा आवाज येत होता. त्यामुळे काय प्रकार आहे हे पाहण्यासाठी घोडके आवाजाच्या दिशेने गेले. त्यानंतर यातील हल्लेखोरांनी विनाकारण घोडके यांच्यावर कोयत्याने हल्ला केला. घोडके यांनी हात आडवा घातल्याने त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. लोखंडी रॉडनेदेखील त्याला जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर आरोपी पळून गेले. या हल्ल्यात घोडके गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तपास महाळुंगे पोलीस करीत आहेत.