पुणे -नाशिक महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी ठेकेदार खरपुडी येथील एक डोंगर फोडून मुरुमाची वाहतूक गेल्या महिन्यापासून होत आहे. दररोज सुमारे ६० डंपरद्वारे मुरुमाची वाहतूक होत असल्याने येथील खरपुडी खंडोबा येथील अडीच किलोमीटर डांबरी रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. ४० ते ४५ टन डंपरद्वारे मुरुमाची वाहतूक होत असल्याने रस्ता खचला असून ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. रस्ता खचत असल्याने शेतकऱ्याच्या पाईपलाईन फुटत आहे. रस्त्यालगत असलेल्या ड्रेनजलाइन फुटल्या आहेत. पाणी वाहून जाणाऱ्या गटारात मुरुमाचे ढिगारे टाकल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यावर येत आहे. रात्रीच्या वेळी उशिरापर्यत मुरूमाची यंत्राद्वारे खोदाई सुरू असल्याने त्याचा त्रास येथील स्थानिकांना होत आहे. काही दिवसांपूर्वी मुरुम वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराला ग्रामस्थांनी या रस्त्याची पुन्हा दुरुस्ती करणार का? याबाबत गावात बैठकीसाठी बोलविले होते. मात्र, ठेकेदारांनी नकार दिला. त्यामुळे खरपुडीचे सरपंच हिरामण मलघे, निवृत्ती गाडे, सीताराम गाडे, देवस्थान ट्रस्ट्रीचे अध्यक्ष सोपान गाडे, प्रकाश गाडे, राजेश गाडे यांच्यासह ग्रामस्थांनी व तरुणांनी आक्रमक होत सोमवारी सकाळी मुरुमाचे डंपर रोखले. जोपर्यंत रस्त्याच्या दुरुस्तीचा ठोस निर्णय होत नाही; तोपर्यंत खरपुडी रस्त्यावर अवजड वाहतूक न करण्याची तंबी ग्रामस्थांनी डंपर चालकांना दिली. अवजड वाहतुकीमुळे मार्गाची दुरवस्था झाल्याने रस्त्याच्या दुरुस्तीबाबत ठोस निर्णय केल्याशिवाय पुन्हा डंपर वाहतूक सुरू करण्याचा प्रयत्न झाल्यास रोड कंपनी आणि ग्रामस्थांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अवजड वाहतुकीमुळे मार्गाची खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. त्यामुळे दुचाकी, रिक्षा व अन्य छोट्या वाहनांना त्रास होत असल्याने ग्रामस्थांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
फोटो ओळ : खरपुडी (ता. खेड) येथे मुरुमाचे डंपर ग्रामस्थांनी रोखून रस्त्यावरील वाहतूक बंद केली. फोटो ओळ: अवजड वाहतुकीमुळे रस्त्यावर पाईपलाईन फुटल्या आहेत.