वडगाव निंबाळकर : मुर्टी (ता. बारामती) येथे रविवारी (दि. ३१) सायंकाळी ५ च्या सुमारास सोसाटयाच्या वाऱ्यासह विजांच्या कडकडाटात पाऊस पडला. यामध्ये परिसरातील फळबागांचे घरांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. रविवारी दिवसभर तीव्र उखाडा वाढला होता. सायंकाळी ५ च्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यानंतर वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाला सुरूवात झाली. या दमदार पावसामुळे शेतात पाणी साठले होते. शेतकरी वर्गामधून समाधान ही व्यक्त करण्यात येत होते. परंतु, वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. आनंदा सोमा गोफर्णे, बबन दिनकर येळे, अरूण एकनाथ नवले, दीपक शिवाजी नलवडे, सुभाष बबन जगदाळे यांच्या घरांची पडझड होऊन घरांवरील पत्रा उडुन गेला. मुर्टी (चव्हाणवस्ती) येथे विजय शिवाजी चव्हाण, यशवंत शिवाजी चव्हाण यांच्या जनावरांच्या गोठ्याची भिंत पडुन मोठे नुकसान झाले. निरवांगी : इंदापूर तालुक्याच्या पश्चिम भागातील निमसाखर परिसराला मुसळधार पावसाने झोडपले. पावसामुळे ओढे, नाले पाण्याने भरून वाहू लागले आहेत. निमसाखर-निरवांगी रस्त्यावर निमसाखर या ठिकाणी रस्त्यावर पाणी साठले आहे. निमसाखर ग्रामपंचायत व बांधकाम विभागाने येथील पाहणी त्वरित करावी, अशी मागणी प्रवासी व निमसाखर येथील नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)
मुर्टी परिसराला पावसाने झोडपले
By admin | Published: June 02, 2015 4:57 AM