भोर : तालुक्यातील ६३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत पुणे-सातारा महामार्गासह पूर्व भागातील अनेक गावात प्रस्थापितांना पराभव पत्करावा लागला. काही ग्रामपंचायस्चे सत्तांतर झाले. काहींनी आपली सत्ता कायम राखली आहे. तालुक्याबरोबरच महामार्गावर काँग्रेसने मुसंडी मारत ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर राष्ट्रवादीने अनेक ठिकणची सत्ता कायम राखली आहे. शिवसेनेची मात्र पीछेहाट झाली असून भाजपची तालुक्यात पूर्ण वाताहात झाली आहे.
भोर तालुक्यातील ७३ पैकी १० ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या होत्या. ६३ ग्रामपंचायतीच्या ६५७ जागासाठी ७७० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. सोमवारी सकाळी १० वाजता आयटीआय येथे तहसीलदार अजित पाटील यांनी मतमोजणीस सुरुवात केली. ३० टेबलावर ९ फेऱ्यासह मतमोजणी करण्यात आली. पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ग्रामपंचायतीत शिवसेना तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांच्या पॅनेलचा पराभव करुन ९ पैकी ६ जागा राष्ट्रवादी, शिवसेना बंडखोर व काँग्रेस यांच्या पॅनलने जिंकून मागील २० वर्षांपासूनची शिंदे यांची सत्ता घालवून परिवर्तन घडवले. तर महामार्गावरील सर्वात मोठी असलेली वेळु ग्रामपंचायतीतही माजी उपसभापती अमोल पांगारे यांच्या पॅनेलचा पराभव करुन माजी सरपंच माऊली पांगारे यांच्या पॅनेलने ११ पैकी ८ जागा जिंकून ग्रामपंचायतीत परिवर्तन घडवले. तर ससेवाडी ग्रामपंचायतीत मुंबई बाजार समितीचे उपसभापती धनंजय वाडकर यांच्या पॅनेलने ७ पैकी ५ जागा जिंकून सत्ता कायम राखली आहे. शिवरे ग्रामपंचायत निवडणुकीत ९ पैकी ५ जागा जिंकून काँग्रेसने सत्ता मिळवली आहे. राष्ट्रवादीला ४ जागा मिळाल्या आहेत. हातवेबु व हातवेखु तांभाड तीन्ही ग्रामपंचायती माजी उपसभापती विक्रम खुटवड यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलने कायम राखल्या आहेत. नसरापूर ग्रामपंचायत पुन्हा एकदा काँग्रेस आघाडीकडेच राहिली आहे. केंजळ ग्रामपंचायतीच्या पाच जागा बिनविरोध झाल्या होत्या. तर निवडणूक लागलेल्या ४ जागा राष्ट्रवादीने जिंकल्याने ग्रामपंचायत पुन्हा राष्ट्रवादीकडे राखण्यात माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांना यश आले आहे. किकवी ग्रामपंचायतीत ९ पैकी ८ जागा काँग्रेसच्या दत्तात्रय भिलारे यांच्या पॅनेलने जिंकून सलग एकहाती सत्ता कायम राखली. तर राष्ट्रवादीला एक जागा मिळाली आहे. सारोळे ग्रामपंचायतीत माजी सरपंच शंकर धाडवे यांचा पराभव झाला. त्यांच्या पॅनेलला ३, तर काँग्रेसचे मचिंद्र धाडवे आणि राष्ट्रवादीचे महेश धाडवे यांच्या पॅनेलला ६ जागा मिळाल्या आहेत. टापरेवाडी ग्रामपंचायतीत सत्तांतर होऊन ग्रामपंचायत काँग्रेसकडे गेली आहे. महेश टापरे यांच्या काँग्रेसच्या पॅनेलला ६ तर विद्यमान सरपंच रेखा टापरे यांच्या पॅनेलला एक जगा मिळाली आहे. न्हावी १५ ग्रामपंचायत जिल्हा बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या पॅनेलने ४ जागा जिंकून ताब्यात घेतली. तर काँग्रेसला ३ जागा मिळाल्या आहेत. न्हावी ३२२ मध्ये काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश सोनवणे व के. डी सोनवणे यांच्या काँग्रेस पॅनेलला ५ तर राष्ट्रवादीच्या पॅनेलला २ जागा मिळाल्या आहेत. भोंगवली ग्रामपंचायतीत ४ जागा राष्ट्रवादी ४ जागा काँग्रेस एक जागा शिवसेनेला मिळाली. काँग्रेस व शिवसेनेच्या ताब्यात ग्रामपंचायत कायम राहिली आहे. गुणंद ग्रामपंचायतीत सत्तातर होऊन राष्ट्रवादीची सत्ता आली आहे. वर्वे खुद ग्रामपंचायत शिवसेनेकडून सत्तांतर होऊन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीकडे सत्ता आली आहे. वीसगाव खोऱ्यात आंबाडे ग्रामपंचायतीत भाजपाचे प्रदीप खोपडे यांच्या विरुध्द काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यानी एकत्र आघाडी करुन ग्रामपंचायत लढवून सर्व ७ च्या ७ जागा जिंकल्या. प्रदीप खोपडे यांनाही निवडणुकीत पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीची १५ वर्षांची सत्ता गेल्याने प्रदीप खोपडे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. बालवडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीने ४ तर काँग्रेसला ३ जागा मिळाल्याने सत्तांतर होऊन भोर पंचायत समितीचे सभापती श्रीधर किंद्रे यांच्या राष्ट्रवादी पॅनेलची सत्ता आला आहे.
धावडी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या पँनलने मुसंडी मारत सर्व ६ जागा जिंकल्या. मंगेश दरेकर यांनी अमित दरेकर यांचा पराभव करुन ग्रामपंचायतीत सत्तांतर घडवले आहे. काँग्रेसला हा धक्का मानला जात आहे. वीसगावमधील पाले, गोकवडी या ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीकडे तर बाजारवाडी खानापुर या काँग्रेसकडे तर नेरे ग्रामपंचायत पुर्वीच बिनविरोध आहे. नऱ्हे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला ४ तर काँग्रेसला ३ जागा मिळाल्या असुन ग्रामपंचायत राष्ट्रवादीकडे गेली आहे. जोगवडी ग्रामपंचायत राष्ट्रवादीला ३ तर माजी सरपंच सुभाष धुमाळ व सदाशिव धुमाळ यांच्या पँनलला ४ जागा मिळाल्या आहेत. चिखलावडे ग्रामपंचायतीत काँग्रेस ४ तर राष्ट्रवादी ३ जागा मिळाल्या आहेत. जांभळी ग्रामपंचायत शिवसेनेकडे गेली आहे. पोम्बर्डी ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीला ३ तर काँग्रेस शिवसेना आघाडीला ३ जागा मिळाल्या आहेत. माजगाव ग्रामपंचायतीत शरद पडवळ यांच्या पँनलने ७ पैकी ५ जागा जिंकुन ग्रामपंचायत काँग्रेसकडे आली आहे.
चौकट
ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसने महामार्गावर मुसंडी मारत अनेक ग्रामपंचायती जिंकल्या आहेत. महामार्गावरील शिवसेनेच्या ताब्यातील अनेक ग्रामपंचायती काँग्रेसने जिंकल्या आहेत. वीसगाव खोऱ्यात राष्ट्रवादीने चार ग्रामपंचायतीवर विजय मिळवला आहे. अनेक दिग्गज नेत्याचा पराभव झाला असुन अनेकांच्या ग्रामपंचायती हातातुन गेल्या आहेत. भोर तालुक्यात काँग्रेसने सर्वाधीक जागा त्यानंतर राष्ट्रवादीने जागा मिळवल्या आहेत. शिवसेनेच्या अनेक ग्रामपंचायतीची सत्ता हातातुन गेली आहे.
फोटो: निवडणुक निकाल लागल्यानंतर जल्लोष करतांना कार्यकर्ते.