पुणे : शारीरिक अंतर ठेेवण्याच्या सर्व नियमांचे पालन करून वस्तुसंग्रहालये पुन्हा खुली करण्याची परवानगी जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ४ जानेवारीपासून देण्यात आली आहे. स्वच्छता, दुरुस्ती आदी सर्व कामे मार्गी लावून येत्या दोन दिवसांमध्ये शहरातील वस्तुसंग्रहालये सुरू करण्याच्या दृष्टीने तयारीला वेग आला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर ३१ जानेवारीपासून वस्तुसंग्रहालये बंद करण्यात आली. वस्तुसंग्रहालयांना विविध ठिकाणचे पर्यटक, अभ्यासक, इतिहासप्रेमी आवर्जून भेट देत असतात. कोरोनाचा प्रादुर्भाव काहीसा कमी झाल्यावर आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यापासून हळूहळू सर्व व्यवहार पूर्ववत होऊ लागले. नाट्यगृहे, चित्रपटगृहे, उद्याने टप्प्याटप्प्याने खुली होत असताना संग्रहालयेही सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शासनातर्फे करण्यात आली होती.
जिल्हाधिकारी कार्यालयाने ४ जानेवारीपासून संग्रहालये खुली करण्यास परवानगी दिली. हा निर्णय ६ जानेवारीपर्यंत संग्रहालय संचालकांकडे पोहोचला. त्यानंतर पुढील तीन-चार दिवसांत सर्व तयारी पूर्ण करुन रविवार किंवा सोमवारपासून संग्रहालये पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. शारीरिक अंतर राखणे, मास्कचा वापर, सॅनिटायझर हे नियम सक्तीचे करण्यात येणार आहेत.
----------------------
राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संस्थापक दिनकर गंगाधर केळकर यांची १० जानेवारी रोजी १२६ वी जयंती आहे. त्यांनी वस्तूंचा संग्रह करायला सुरुवात केली, त्यासही १०१ वर्षे पूर्ण होत आहेत. या दोन्ही घटनांचे औचित्य साधून छोटेखानी कार्यक्रम करुन १० जानेवारी रोजी राजा दिनकर केळकर संग्रहालय खुले करण्याची तयारी सुरु आहे.
- सुधन्वा रानडे, संचालक, राजा दिनकर केळकर संग्रहालय
-------------------
शासनातर्फे संग्रहालये सुरु करण्याची परवानगी मिळाली आहे. विश्वस्तांशी चर्चा करुन त्याप्रमाणे सोमवारी किंवा मंगळवारी वस्तू संग्रहालये सुरु केली जातील. त्यादृष्टीने स्वच्छतेचे कामही सुरु आहे.
- राजीव विलेकर, संचालक, महात्मा फुले संग्रहालय, घोले रस्ता