पुणे : पुण्याला सांस्कृतिक नगरीच नव्हे तर संग्रहालयांचं शहर देखील म्हटलं जातं. इतिहासकालीन प्राचीन वस्तूंचे जतन आणि संवर्धन करण्याबरोबरच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याचा प्रवास उलगडणारे संग्रहालय आणि स्मारक यांसारखी शहरातील विविध संग्रहालये पुण्याची भूषण ठरली आहेत. मात्र, कोरोनामुळे हीच संग्रहालये आर्थिक विवंचनेत सापडली आहेत.
गेल्या वर्षभरापासून संग्रहालये बंद असल्यामुळे उत्पन्न घटले आहे. एकीकडे हाताशी म्हणावा तसा पैसा नाही, पण संग्रहालयांच्या देखभाल दुरुस्तीवर मात्र पैसा खर्च करावा लागत आहे अशी संग्रहालयांची अवस्था झाली आहे. दरम्यान, उद्याचा (दि. 18) आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन हा सलग दुसऱ्या वर्षी पर्यटकांविना सुना सुनाच जाणार आहे. पुन्हा संग्रहालय कधी सुरू होतील, या प्रतीक्षेत संग्रहालय चालक आहेत.
याविषयी राजा दिनकर केळकर संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी ’लोकमत’ला सांगितले की, गतवर्षी कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे मार्च ते डिसेंबर दरम्यान संग्रहालय बंद होते. मात्र, लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर, जानेवारीमध्ये आम्ही संग्रहालय सुरू केले होते. पर्यटकांचा प्रतिसादही उत्तम मिळायला लागला होता. मात्र, मार्चमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आणि पर्यटकांची संख्या पुन्हा रोडावली आणि एप्रिलमध्ये संचारबंदी लागू झाली. या लॉकडाऊन आणि संचारबंदीच्या काळात संग्रहालयाचे उत्पन्न शून्य झाले आहे.
सिंबायोसिस संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाच्या मानद संचालिका संजीवनी मुजुमदार म्हणाल्या की, कोरोनापूर्वी आमच्या संग्रहालयाला वर्षभरात ६० ते ७० हजार पर्यटक भेट द्यायचे. महिन्याला ही संख्या ५०० च्या घरात असायची आणि ज्यावेळी शहरातील विविध शाळा भेटी द्यायच्या तेव्हा हाच आकडा महिन्याला १५ हजारपर्यंत जात असे. मात्र गेल्या दीड वर्षात सर्वच बंद पडले आहे.
चौकट
इंटरॉशनल कौन्सिल ऑफ म्युझियमचे मुख्यालय हे पॅरिसमध्ये आहे. दर वर्षी आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिनानिमित्त त्यांच्याकडून एक थीम दिली जाते. यावर्षीची थीम ही ‘रिकव्हरी आणि रिइमॅजिन’ अशी आहे. संग्रहालयांनी आर्थिक गर्तेतून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करावेत आणि संग्रहालयाकडे लोकांनी कोणत्या दृष्टिकोनातून पाहावे, त्यात काय बदल करणे आवश्यक आहे.