पुणे : शरीर, बुद्धी, मन यातून उत्कृष्ट संगीत निर्माण होते. लय आणि स्वरांनी तो शब्द मनात स्थिर होतो. गदिमांचे गीतरामायण आणि सुधीर फडके यांच्या संगीताच्या साक्षीदाराला हा पुरस्कार मिळतो आहे याचा विशेष आनंद आहे. भावना व शब्द यांच्या आधाराने संगीत पूर्ण होते, असे मत तालयोगी सुरेश तळवलकर यांनी व्यक्त केले.गदिमा प्रतिष्ठानच्या वतीने ग. दि. माडगूळकर यांच्या ४० व्या स्मृतिदिनानिमित्त यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक प्रभाकर जोग यांना, गृहिणी सखी सचिव पुरस्कार पुष्पाताई भट, चैत्रबन पुरस्कार निवेदिका धनश्री लेले, विद्या प्रज्ञा पुरस्कार गायिका सावनी रवींद्र, गदिमा पारितोषिक आरोही खोडकुंभे यांना प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी आनंद माडगूळकर, श्रीधर माडगूळकर उपस्थित होते. तळवलकर म्हणाले, ‘‘गुरूकडून शिकायचे असते, पण शिकल्यानंतर ते मनातून उतरावयाचे असते. जोग यांचे व्हायोलिनवादन ऐकताना गाणे ऐकल्याचा भास होत होतो. त्यांच्या वाद्यातून शब्द ऐकायला येत होते. साधनेतून काही लोकांचे चेहरे वाचता येतात. त्यामधे गदिमा एक होते. जोग म्हणाले, की एका महाकवीच्या नावाचा पुरस्कार मिळणे हे मी माझे भाग्य समजतो. माझ्या कारकिर्दीची सुरुवात गदिमांच्या गाण्याने केली होती. त्या वेळी ते म्हणाले होते, की मी टाकून दिलेल्या गाण्याचे तू सोने केले. तेव्हापासून मी ठरवले की सोन्यासारखे काम करून मोठे व्हायचे. लेले म्हणाल्या, गदिमा ही तीन अक्षरे खूप वजनदार आहेत. गदिमा म्हणजे भव्यतेचा हिमालय होते. गदिमांचे साहित्य सर्व क्षेत्र व्यापून टाकते. अभिजित कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. राम कोंजटकर यांनी आभार मानले.
गदिमांच्या स्मारकाचा मुद्दा अनेकदा उपस्थित होऊनही त्यांचे स्मारक होऊ शकले नाही. मोहन धारिया, ना. धों. महानोर यांनीही स्मारकाची वेळोवेळी मागणी केली आहे. पुण्यात गदिमांचे स्मारक होणे हे पुण्याला पुण्यभूषण आहे. यासाठी राज्य सरकार व पुणे महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा. - श्रीधर माडगूळकर