पुणे : संगीतामध्ये विधानाची पूर्तता मुखड्याने होते. ऐकणारे श्रोते मुखडा घेऊन जात असतात. संगीत ऐकताना मुखड्याची नशा यावी लागते. तालाचा छंद झाला की नशा येते. छंदमय, धुंदमय झाल्यावर संगीत संपत नाही तर सूरु होते, असे मत तालयोगी पंडित सुरेश तळवळकर यांनी व्यक्त केले.
थर्ड बेल एंटरटेनमेंट आयोजित कलातीर्थ पुरस्कार-२०२० सोहळ्यात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले उपस्थित होते. अवधूत गुप्ते, कैशल इनामदार, अमितराज, राहुल रानडे आदी ११ संगीतकारांना तळवळकर यांच्या हस्ते पुरस्कार दिला. तर मरणोत्तर नरेंद्र भिडे यांना पुरस्कार प्रदान केला. तसेच ज्येष्ठ निवेदिका मंगला खाडिलकर यांच्या हस्ते भाऊ मराठे स्मृती पुरस्कार निवेदक-अभिनेते विघ्नेश जोशी व निवेदिका अभिनेत्री डॉ. समीरा गुजर यांना प्रदान केला. पडद्यामागील कलाकार व तंत्रज्ञानांचा सन्मानपत्र देऊन मोहोळ यांच्या हस्ते गौरविले. यावेळी संस्थापक स्वप्नील रास्ते, प्रज्ञा रास्ते उपस्थित होते.
मोहोळ म्हणाले की, आम्ही राजकारणातले कलाकार आहोत. शहराला सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखले जाते. पुण्यात मोठे सांस्कृतिक वैभव आहे. अशा पुरस्कारातून कलाकारांना प्रोत्साहन मिळते. ज्या क्षेत्रात आपण काम करतो त्या क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करणे हे कौतुकास्पद आहे. राजकीय क्षेत्रात असे कौतुक होतेच असे नाही. अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच त्यांनी भिडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.
स्वप्निल रास्ते यांनी प्रस्ताविक केले. अमेय पांगारकर, सायली बाभुळगावकर यांनी सूत्रसंचालन केले. तर गैरव गोखले यांनी आभार मानले.