शिवानी खोरगडे
पुणे : मनसे नेते वसंत मोरे यांनी केलेलं महाआरतीचं नियोजन शहरभर गाजतंय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा फोटो बॅनर वर लावत मोरे यांनी जणू मी तुमचा हनुमान आणि तुम्ही माझे श्रीराम असाच संदेश दिलाय. ज्या हनुमानजींच्या मुर्ती समोर वसंत मोरे यांनी महाआरती केली. ती मूर्ती मात्र रियाझ शेख नामक मुस्लिम मुर्तीकाराने रंगवली आहे. एकीकडे मशिदीवरचे भोंगे काढण्यावरून मनसे आक्रमक आहे. तर दुसरीकडे त्याच मनसेचे कट्टर नेते वसंत मोरे यांनी काहीशी नमती भूमिका भोंगे संदर्भात घेतली आहे.
मूर्ती रंगकाम करणारे रियाझ शेख आपल्या कलेविषयी सांगताना म्हणाले, "मला आनंद आहे की मी माझ्या कलेतून आज हनुमानाची मूर्ती रंगवली. तात्या जे सांगतील त्याचं पालन करणं एवढंच माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. यापूर्वीही मी विविध देवीदेवतांच्या मुर्त्या रंगवल्या आहेत. मला माझ्या कलेतून जितकं काम करता येईल त्यात मी खुश आहे."
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर होते. तेव्हा वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या फोटोचं महाआरती संदर्भात बॅनरही लावलं होतं. मात्र मोरे ज्यांचे हनुमान स्वतःला म्हणवून घेतात आणि ज्यांना श्रीरामाचा दर्जा त्यांनी आपल्या आयुष्यात दिलाय ते राज ठाकरे या महाआरतीला अनुपस्थित राहिले.