पुणे : मुस्लिम समाजाला दिलेले 5 टक्के आरक्षण कायम करावे यासह विविध मागण्यांसाठी पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पुणे जिल्हा मुस्लिम मूक महामोर्चाच्या वतीने गोळीबार मैदान ते विधानभवनपर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला सकाळी अकरा वाजता सुरुवात झाली आहे. त्यात हजारो नागरिक सहभागी झाले असून महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे.
गोळीबार मैदानावरुन निघालेला मूक मोर्चा सेव्हन लव्ह चौकातून सोनवणे हॉस्पिटल, रामोशी गेट, केईएम रुग्णायल, नरपतगिरी चौकातून जिल्हापरिषदेच्या जुन्या इमारतीसमोरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते साधू वासवानी चौक ते विधानभवनासमोर पोचणार आहे. मोर्चाच्या नियोजनासाठी सुमारे तीन हजार स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. मोर्चामध्ये कोणत्याच घोषणा दिल्या जाणार नाहीत. मोर्चाच्या नेतृत्वात सर्वांत पुढे मुली असून, त्यानंतर महिला, ज्येष्ठ नागरिक, तरुणानंतर राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि नेते आहेत.
मुस्लिम समाजासह अनेक पक्ष, संघटनाचे कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. अनेक अपंग, महिलाही ही मोर्चामध्ये सहभागी झाले आहेत. मोर्चात सहभागी झालेल्यांना सूचना देण्यासाठी वाटेत स्पिकरची व्यवस्था करण्यात आली आहे़. आरक्षण कायम करावे या प्रमुख मागणीसह गोरक्षा, लव्ह जिहाद व अन्य कोणत्याही कारणाने निष्पाप मुस्लिम व्यक्तींची मॉब लीचिंगद्वारे भर रस्त्यावर हत्या केली जात आहे. यासह वक्फ बोर्डाच्या जमिनींवरील सर्व अतिक्रमणे दूर करण्यात यावीत, दलित व मुस्लिमांवरील जातीय, धार्मिक अत्याचाराच्या घटना रोखण्यात याव्यात, मुस्लिम समाजाला अॅट्रासिटी कायद्याचे संरक्षण या मागण्यांचे फलक आंदोलकांच्या हातामध्ये फलक आहेत.