पुणे : मुस्लिम समाजाने सामाजिक एकतेचा आदर्श घालून दे ‘लोकमत’च्या रक्तदान महायज्ञात सक्रिय सहभाग नोंदविला. देशात प्रथमच मशिदीमध्ये शिबिराचे आयोजन झाले. त्यात शेकडो मुस्लिम बांधवांनी रक्तदान करून आपले ‘रक्ताचे नाते’ जपले.
‘लोकमत’चे संस्थापक स्व. जवाहरलालजी दर्डा यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी, बंधुभाव भाईचारा फाऊंडेशचे अध्यक्ष शब्बीरभाई शेख, नूर-ए-हिरा मशिदीचे अध्यक्ष हाजी जकेरिया मेमन, पुणे शहर तांबोळी समाज, अध्यक्ष हाजी नजीर तांबोळी, हाजी नूर सय्यद धायरिवाले, हाजी बाजील शेख, हाजी सादिक शेख, हाजी नजीर सय्यद, अब्दुल वहाब शेख, जकीउद्दीन शेख, मोहसीन हसन शेख आदी उपस्थित होते.
''बंधुभाव-भाईचारा फाऊंडेशनचे अध्यक्ष शब्बीरभाई शेख यांनी समाजातील २२ संघटनांशी संपर्क साधून रक्तदान शिबिर आयोजित केले. मार्केट यार्ड येथील गंगाधाम चौकात असलेल्या ''नूर-ए-हिरा'' मशिदीमध्ये पुरुषांसाठी आणि महिलांसाठी शेजारच्या सोसायटी हॉलमध्ये व्यवस्था केली होती. दिवसभरात १२६ स्त्री-पुरुषांनी रक्तदान केले.
----
कोरोनाच्या काळात मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणावर सामाजिक कामे केली. या उपक्रमात ''लोकमत''ने आम्हाला सहभागी करून घेतले त्याबद्दल धन्यवाद. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशावर कोणतीही आपत्ती आली तर मुस्लिम समाज एक पाऊल पुढे टाकतो.
- शब्बीरभाई शेख, अध्यक्ष, बंधुभाव-भाईचारा फाऊंडेशन
-----
मुस्लिम समाज मुख्य प्रवाहात येऊन काम करण्यास तयार आहे. समाजाची शैक्षणिक आणि आर्थिक प्रगती होत आहे. आज ''लोकमत'' आणि संपूर्ण मुस्लिम समाजाने एकत्र येत नवे नाते निर्माण केले आहे. खरे नाते रक्ताचे नाते असते. आज एकमेकांना एकमेकांचे रक्त देऊन प्राण वाचविले जात आहेत. ही मानवतेची सेवा आहे.
- हाजी जकेरिया मेमन, अध्यक्ष, नूर-ए-हिरा मस्जिद
----
आपण सर्व भारतीय आहोत आणि ही आपली मातृभूमी आहे. या नात्याने आपण सर्व बांधव आहोत. त्यामुळे आपल्याच बांधवांसाठी रक्त देताना आम्हाला गौरव वाटतो आहे. विशेष म्हणजे आमच्या महिलादेखील आज घराबाहेर पडल्या आणि रक्तदान केले. ''लोकमत''ने हा अभिनव उपक्रम राबवित सामाजिक एकतेचे नवे नाते प्रस्थापित केले आहे.
- हाजी नजीर तांबोळी, अध्यक्ष, पुणे शहर तांबोळी समाज
-----
मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. एरवी बुरख्याआड असलेल्या आणि घराबाहेर न पडणाऱ्या महिला रक्तदानासाठी बाहेर पडल्या. जवळपास ८० महिला रक्तदान शिबिरासाठी दाखल झाल्या होत्या. परंतु, यातील १२ जणींचे यशस्वी रक्तदान झाले.