पुणे : काश्मीर येथील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघातकी हल्ल्याचा मुस्लिम सत्यशाेधक मंडळाने तीव्र शब्दात निषेध केला आहे. तसेच या हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना आदरांजली व्यक्त करण्यात आली.
काल काश्मीर मध्ये दहशतवादी हल्यामध्ये 44 सीआरपीएफचे जवान शहीद झाले. या दहशतवादी हल्ल्याचा देशभरात निषेध नाेंदविण्यात येत आहे. पुण्यातील मुस्लिम सत्यशाेधक मंडळाकडून या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध नाेंदवला आहे. मंडळाने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हंटले आहे की, अशा प्रकारच्या अमानवी दहशतवादी कार्यामुळे देशात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. देशाच्या सूरक्षतेबरोबरच सामान्य लोकांचे जीवन यामुळे अस्वस्थ झाले आहे. काश्मीरमध्ये तसेच भारतात अशाप्रकारच्या दुष्ट कारवाया पुन्हा पुन्हा उदभवू शकतात आणि निष्पापांना याची किंमत मोजावी लागणार आहे.
अशाप्रकारच्या अमानवी घटना वाढवून देशासमोर दहशतवाद्यांनी मोठे संकट उभे केले आहे. अशा कृत्याचा सर्वस्तरातून निषेध व्यक्त करुन देशासमोरील या अव्हानाचा मुकाबला करण्यासाठी सरकार आणि सर्वधर्मिय नागरिकांनी सतर्कता दाखवून एकजुटतीने सामना करण्यासाठी पावले उचलण्याचे अवाहन मुस्लीम सत्यशोधक मंडळ करीत आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या भारतीय जवानांना श्रधांजली वाहत असतांनाच या जवानांच्या कुटूबियांसोबत दुःख आणि सहवेदना व्यक्त करीत आहे.