लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : मुस्लीम सत्यशोधक मंडळाच्या वर्धापनदिनानिमित्त ‘स्वातंत्र्यसैनिक बाबुमियॉं बँडवाले राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार’ भिवंडी येथील सामाजिक कार्यकर्ते सल्लाहुद्दीन शेख यांना तर ‘सत्यशोधक फातिमाबी शेख कार्यगौरव सन्मान’ भाषा आणि व्याकरणतज्ज्ञ डॉ. यास्मिन शेख यांना जाहीर झाला आहे.
याशिवाय शिर्डी मंडळाचे माजी उपाध्यक्ष प्रा. वि. अ. शेख यांच्या नावाने मंडळाचे कार्य आणि विचार विस्तारात योगदान देणा-या युवा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी देण्यात येणारा ‘सत्यशोधक प्रा. वि. अ. शेख युवा पुरस्कार’ जावेद शाह यांना जाहीर झाला आहे. तसेच महिला, अल्पसंख्याक आणि सर्वधर्मीय समाजाच्या शैक्षणिक विकासासाठी कार्यरत असलेले महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे प्रमुख डॉ. पी. ए. इनामदार यांना ‘मुस्लिम सत्यशोधक सुवर्णजयंती पुरस्कार’ देण्यात येणार आहे. मानवी हक्कांसाठी लढा देणा-या तिस्ता सेटलवाड यांना ‘समाज प्रबोधन पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे. सेंटर फॉर प्रमोशन फॉर डेमोक्रसी अँड सेक्युलॅरिझमचे अध्यक्ष प्रा. जहीर अली यांना लोकशाही मूल्यांसाठी केलेल्या कामाबद्दल ‘समाज प्रबोधन पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यवतमाळचे पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील-भुजबळ यांचा सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता या कामासाठी विशेष सत्कार करण्यात येणार आहे.
हमीद दलवाई यांनी स्थापन केलेल्या मंडळाचा आज (दि.२२) ५१ वा वर्धापनदिन आहे. कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सुवर्णजयंती वर्षातील पुरस्कार प्रदान कार्यक्रम आयोजित करता आला नाही. यंदाही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन मंडळाचा पुरस्कार वितरण समारंभ हमीद दलवाई यांच्या स्मृतिदिनाच्या पार्श्वभूमीवर २ मे रोजी आझम कॅम्पस येथे आयोजित केला जाणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी सांगितले.
--------
सत्यशोधक फातिमाबी शेख आधार केंद्र
तलाकबंदी विधेयकानंतरही मुस्लीम महिलांना विविध कौटुंबीक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ५० वर्षांपासून मंडळ करीत असलेला महिला अन्याय निवारणाचा संघर्ष संपलेला नाही. तलाकची प्रकरणे न्यायालयीन प्रक्रियेतूनच सोडवली जावी ही मंडळाची आग्रही भूमिका आहे. त्यासाठी मंडळ विविध स्तरावर प्रयत्न करणार आहे. त्याचाच भाग म्हणून विविध ठिकाणी सत्यशोधक फातिमाबी शेख आधार केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. मुस्लीम सत्यशोधक कार्यकर्ता अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे, असे प्रा. जमीर शेख आणि दिलावर शेख यांनी सांगितले.
-------