पुणे : देशात मुस्लिमांसंबंधी काही अनुचित प्रकार घडत आहेत. पण इतर देशापेक्षा भारतातील मुस्लिम समाज सुरक्षित असून स्वातंत्र्यदेखील आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते इब्राहिम खान यांनी व्यक्त केले.हमीद दलवाई स्मृती पुरस्कार इब्राहिम खान यांना माजी न्यायमूर्ती हेमंत गोखले यांच्या हस्ते देण्यात आला. त्या वेळी खान बोलत होते. हमीद दलवाई इस्लामिक रिसर्च अॅन्ड इन्स्टिट्यूट आणि साधना साप्ताहिकाने कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी पाकिस्तानातील संपादक अजमल कमाल, इन्स्टिट्यूटच्या मेहरुन्निसा दलवाई, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बहाळकर उपस्थित होते. इतर देशामधील मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असुरक्षित आणि दहशतीखाली जीवन जगत आहे. त्या तुलनेत भारतातील मुस्लिम समाज हा सुरक्षित आहे, पण याची भारतातील मुस्लिम समाजाला जाणीव आहे का ? असा सवाल इब्राहिम खान यांनी उपस्थित केला. हमीद दलवाई हे मुस्लिम धर्माच्या पुढचा विचार करत होते. त्यांच्या विचारांची समाजाला गरज आहे. पण त्यांचे विचार समजून घेण्याची मुस्लिमांची तयारी नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.(प्रतिनिधी)पुरस्काराबद्दल कौतुकहमीद दलवाई जे काम करत होते, त्यामुळे ते समाजापासून दूर गेले. समाजही आपल्याला दूर लोटेल या भीतीमुळे दलवाई यांच्या नावाने पुरस्कार घेण्यास अनेक जण नकार देतात. पण खान यांनी पुरस्कार स्वीकारल्याबद्दल त्यांचे भाई वैद्य यांनी कौतुक केले. सर्वच समाजामध्ये मोठ्या प्रमाणात समस्या आहेत. धर्मचिकित्सा आणि चुकीच्या गोष्टींसंबंधी प्रगतिशील भूमिका घेण्याची गरज आहे.- हेमंत गोखले
भारतातील मुस्लिम सुरक्षित
By admin | Published: May 04, 2017 3:00 AM