प्रकाश आंबेडकर : २७ जानेवारीला आंदोलन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली मुस्लिम समाज दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देत आहे. त्या पार्श्वभूमीवर २७ जानेवारीला मुस्लिम समाज राज्यस्तरीय आंदोलन करणार आहे, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे.
आंबेडकर म्हणाले की, केंद्र शासनाने शेतकरी कायद्यासंदर्भात काढलेले तोडगे शेतकरी नेत्यांना मान्य नाहीत. सर्वोच्च न्यायालयाने तयार केलेल्या समितीशी शेतकरी चर्चा करण्यास तयार नाहीत. देशातील इतर राजकीय पक्षही शाब्दिक पाठिंबा देत आहेत. मुस्लिम समाज नेहमी धार्मिक प्रश्नांवरच आवाज उठवतो असा गैरसमज पसरला आहे. त्यामुळे मुस्लिम समाज या आंदोलनात सहभागी होण्यासाठी पाठिंबा देत आहे.
राज्यातील महाआघाडीने शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला आहे. पण तो कृतिशील नव्हता. या समाजाच्या पाठिंब्याने राज्य शासन कृती करेल अशी अपेक्षा आहे. ‘एनआरसी’ आणि ‘सीएए’च्या विरोधात आंदोलन करण्यात आले. त्याचप्रमाणे हे आंदोलन होईल, असे अँड. आंबेडकर म्हणाले.
चौकट
धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा
कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केले आहे. यावर अँड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मुंडेंनी नैतिक जबाबदारी स्वीकारून मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा.