पुणे : लोकप्रतिनिधींनी वारंवार सूचना, लेखी पत्र आणि प्रत्यक्ष अधिकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊनही महापालिका आणि पाटबंधारे विभागाने मात्र निष्क्रियता कायम ठेवल्यानेच मुठा कालवा फुटल्याचा दुर्दैवी प्रसंग उद्भवल्याचा थेट आरोप स्थानिक लोकप्रतिनिधींनी केला आहे.
गुरुवारी सकाळी ११ च्या दरम्यान पुणे शहरातील सिंहगड रस्त्यावरील दांडेकर पुलाजवळ मुठा नदीचा कालवा फुटला. या कालव्याचे पाणी जवळच असणाऱ्या वस्तीमध्ये शिरल्याने सुमारे साडेतीनशेपेक्षा अधिक घरांचे मोठे नुकसान झाले. या घटनेला संपूर्णपणे प्रशासन जबाबदार असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले आहे. पर्वती मतदार संघाच्या आमदार माधुरी मिसाळ यांनी याबाबत २५ फेब्रुवारी २०१८ रोजी पुणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला पत्र लिहिले असून या कामाच्या 'सेफ्टी ऑडिट'ची प्रत मागितली होती. खडकवासला कॅनाल जवळ लष्कर पाणी पुरवठा वाहिनीचे काम सुरु असल्याने कालव्याच्या भिंतीचा भाग ढासळत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते.
स्थानिक नगरसेविका स्मिता वस्ते यांनीही २० जून २०१८ व २९ मे २०१८ रोजी पाटबंधारे विभागाला पत्र लिहिले होते. या पत्रामध्ये कालव्याच्या पाण्याची गळती होत असून दुर्घटना घडल्यास सर्वस्वी पाटबंधारे विभागाची जबाबदारी असेल असे नमूद केले आहे.नगरसेवक शंकर पवार यांनीही अनेक वर्षांपासून पाटबंधारे विभागाकडे पाठपुरावा करूनही कोणतीही हालचाल करण्यात आली नसल्याचे सांगितले. कितीही सांगितले तरी पाटबंधारे विभागाचे अधिकारी दाद देत नसल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला.