पुणे : कालवा फुटल्याच्या घटनेमुळे सकाळी अकरा ते साडेअकराच्या सुमारास सिंचन भवनातील नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी सातत्याने वाजत असल्यामुळे गुरुवारी नियंत्रण कक्षातील कर्मचारी चांगलेच भांबावले. अखेर पोलिसांकडून साडेअकराच्या सुमारास आलेल्या दूरध्वनीनंतर नियंत्रण कक्षाकडून खडकवासला धरणाचे दरवाजे बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या.पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण परिसरातील पाऊस काही दिवसांपासून पाऊस थांबला आहे. त्यामुळे सिंचन विभागाच्या नियंत्रण कक्षातील कर्मचारी तसे निवांतच होते. परंतु, साडेअकराच्या सुमारास ‘दांडेकर पुलाजवळील कालवा फुटला असून कालव्यातील पाणी तत्काळ बंद करा’ अशा सूचना करणारे दूरध्वनी नियंत्रण कक्षात येत होते. त्यानंतर कक्षातील कर्मचाºयांनी तत्काळ वरिष्ठांशी संपर्क साधला. दरम्यानच्या काळात अनेक नागरिकांचेही दूरध्वनी येत होते. त्यातच दत्तवाडी पोलिसांचा कालवा बंद करण्याचा दूरध्वनी आल्यानंतर खडवासल्याचे दरवाजे बंद करण्याचा सूचना नियंत्रण कक्षाकडून देण्यात आल्या.बुधवारी सायंकाळपर्यंत कालव्यातून इंदापूरसाठी १,४२८ क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते. गुरूवारी सकाळी पाण्याचा विसर्ग कमी करून तो १,२७७ करण्यात आला. खडवासला धरणापासून दांडेकर पुलापर्यंतचे अंतर सुमारे १३ कि.मी. अंतर आहे. कालवा बंद केला असला तरी १३ किमी अंतरावरून येणारे पाणी ओसरण्यास सुमारे पाच ते सहा तासांचा कालावधी लागला, असे सिंचन अधिकाºयांनी सांगितले.
mutha Canal : सिंचन विभागातील कर्मचारी भांबावले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 1:56 AM