पुणे : पाण्यासोबत वाहून आलेले कपडे नाहीत तर आमच्या स्वप्नांची लक्तरं आहेत अशा शब्दात दांडेकर पुलाजवळ राहणाऱ्या महिला आक्रोश करत होत्या. आजच्या दिवसाने जणू त्यांच्या स्वप्नांवरच नांगर फिरवला आहे.
गुरुवार....27 सप्टेंबर... पुणेकरांसाठी रोजच्यासारखा उगवलेला दिवस. संपूर्ण पुण्यात नियमित दिनचर्या सुरू असताना दांडेकर पुलाजवळील मुठा कालवा फुटला .यावेळी इथल्या झोपडपट्टीत राहणाऱ्या काहींनी आपला अनुभव लोकमतच्या वार्ताहरांना सांगितला.
रोजच्याप्रमाणे यावेळी पोळ्या करणाऱ्या अर्चना यांना सुरुवातीला काही समजलंच नाही.अचानक पाणी घरात यायला लागलं.त्यामुळे बाहेर कुठे तरी पाईपलाईन फुटली असेल अशा विचारात त्या दारात आल्या तर एक भलामोठा पाण्याचा लोंढा घरात शिरला. त्या सांगत होत्या, मला काही कळण्याच्या आत घरातलं सामान वाहायला लागलं.दुसरीकडे विद्या या मुलांना शाळेत सोडायला निघाल्या होत्या.अचानक मुलांनी आई पाणी येतंय अस सांगितलं.त्यांनी तातडीने मुलांना उंचावर नेले आणि खाली येऊन बघितले तर घर होत्याचे नव्हते झाले झाले. कशाबशा त्या बाहेर पडल्या.पाण्याचा निचरा झाल्यावर घरात आल्या तर काहीही शिल्लक नव्हते. काडीकाडी जमवून संसार उभारला होता.जमेल तसे पैसे साठवून फ्रीज, टीव्ही घेतला होता.सगळं गेलं सांगताना त्यांच्या डोळ्यातलं पाणी आटत नव्हतं.कपाट, त्यातले सोन्याचे दागिने, सारी कागदपत्र गेल्यामुळे आता कुठलाच पुरावा नसल्याचे त्यांनी सांगितले.
शीतल म्हणाल्या की, सारी गडी-माणसं, पोरी कामाला गेली आणि परत आली तर काहीच शिल्लक नाही.या साऱ्यात कसा उभारायचा संसार.आम्ही दहा मिनिटात उध्वस्त झालो. एका आज्जींनी रडताना पोर-बाळ कामाला गेली, आता आल्यावर त्यांना काय दाखवू म्हणत जमिनीवर लोळण घेतली.सार नेलं रे त्याने, आता कच्चेबच्चे काय खातील असा म्हणत त्यांचा आक्रोश थांबत नव्हता.