पुणे - नेहमीप्रमाणे सर्व सुरळीत सुरु असताना अचानक पाण्याचा लोंढा आला आणि सर्व काही धुवून नेले़ खडकवासला येथून येणारा मुठा कालव्याला भगदाड पडल्याने जनता वसाहतीतील अनेकांचे संसार पाण्यात गेले़ हे पाणी पाहून जुन्या जाणत्या अनेकांना पानशेत धरणफुटीच्या आठवणी ताज्या झाल्या़कालवा फुटल्याने रस्त्यावर झालेला जलप्रलय आणि घराघरात साचलेल्या पाण्याची दृश्य टीव्हीवरुन घरात बसलेल्या ज्येष्ठांनी पाहिले़ दांडेकर पूल वसाहतीतील अनेक ज्येष्ठांनी पानशेतचा प्रलय अनुभवलाही होता. संदीपान कांबळे यांनी सांगितले की, पानशेत धरण फुटणार याची थोडीशी कल्पना लोकांना अगोदर आली होती़ प्रत्यक्ष धरण फुटल्यानंतर काही तासांनी शहरात पाणी घुसले़ त्या वेळी पोलिसांनी गाड्यांवर भोंगे लावून लोकांना खबरदार करुन त्यांना घराबाहेर काढले होते़रेडीओवर घोषणा केली जात होती. अनेक सामाजिक कार्यकर्तेही लोकांना सुरक्षित स्थळी नेत होते. त्यावेळी अनेक जण तर धरणफुटीनंतर आलेले पाणी पाहण्यासाठी नदी काठावर आले होते़ या वेळी मात्र लोकांना वेळच मिळाला नाही.शशिकला रोहिदास खराटे यांनी सांगितले की, त्यावेळी आम्ही नवी पेठेत रहात होतो़ घरात माझ्या नंणद, भावजय, दीर असे ९ - १० लोक एकत्र राहात होतो़ लकडी पुलाच्या कमानीला पाणी लागले आणि सर्वत्र एकच कोलाहाल झाला़ पाणी आले पाणी आले़ जे अंगाने मजबूत होते़ ते हाताला येईल ती भांडी कुंडी गोळा करुन धावत उंच जागी जात होते़ आम्ही सर्वांनी हाताला येईल ते घेऊन धावत पळत पर्वतीच्या डोंगरावर गेलो़ तेथे किती वेळ होतो, याची काहीही शुद्ध नव्हती़ कधी एकदा पाणी उतरण्याची वाट पहात होतो़पाणी कमी झाल्यानंतर पुन्हा घरात आलो तर तेथे सर्वत्र चिखल झाला होता़ इतरांचे सामान आमच्या घरात तर आमचे सामान दुसरीकडे वाहून गेले होते़ १९७१च्या दुष्काळानंतर जनता वसाहत व दांडेकर पुलाजवळची वस्ती वसली गेली आहे़ पानशेत धरण फुटले त्यावेळी पाणी तेथपर्यंत पोहोचले नव्हते. गुरुवारी फुटलेल्या कालव्याने जनता वसाहती व त्या परिसरातील लोकांना जराही वेळ दिला नाही़ जलप्रलयाने काही क्षणात होत्याचे नव्हते करुन टाकले़
Mutha Canal : पानशेत पुराच्या आठवणी जाग्या, यावेळी मात्र पाण्याने वेळच दिला नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2018 12:13 AM