पुणे : दाेन अाठवडे उलटून गेले असले तरी दांडेकर पूल वसाहतीतील नागरिक सरकारी मदतीच्या प्रतिक्षेत अाहेत. मुठा कालवा दुर्घटना घडल्यानंतर सरकारकडून माेठ माेठी अाश्वासने देण्यात अाली, घरांचे पंचनामे करण्यात अाले परंतु निधी काही मिळाला नाही, असा अाराेप येथील रहिवासी करत अाहेत. ज्यांची घरं या दुर्घटनेत जमीनदाेस्त झाली ते राेज अापल्या घराकडे हताश हाेऊन पाहत बसतात. घर नाही त्यामुळे कामावर जाता येत नाही, अाणि कामावर नाही म्हंटल्यावर राेजगार नाही. अशा कात्रीत सध्या येथील रहिवासी सापडले अाहेत. घटना घडल्यानंतर काही दिवस नेते मंडळींनी भेटी दिल्या. सध्या मात्र हे पुढारी नाॅट रिचेबल असल्याचे रहिवाशांनी लाेकमतशी बाेलताना सांगितले.
27 सप्टेंबरला मुठा कालवा फुटून त्याचे पाणी दांडेकर पूल वसाहतीत शिरले. त्यामुळे शेकडाे नागरिक क्षणार्धात बेघर झाले. मुख्यमंत्र्यांनी या नागरिकांना पाच काेटीची मदत तात्काळ जाहीर केली हाेती. तसेच महापालिकेकडून सुद्धा मदतीचे अाश्वासन देण्यात अाले हाेते. परंतु अाता दाेन अाठवडे उलटून गेले असले तरी मदत मिळाली नसल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे अाहे. पालिकेने या नागरिकांची साेय सर्जेराव साळवे प्राथमिक विद्यालयात केली अाहे. परंतु किती दिवस त्या शाळेत राहणार असा प्रश्न येथील नागरिक विचारतायेत. त्यांना त्यांचे घर पुन्हा हवे अाहे. घरच राहिलं नसल्याने मुलांच्या शाळेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला अाहे. सध्या हे लाेक येथील बुद्ध विहार तसेच समाज मंदिरात राहत अाहेत. परंतु अंगावर घालण्यासाठी कपड्याशिवाय त्यांच्याकडे काहीच नसल्याने अाता जगायचे कसे असा प्रश्न त्यांना सतवात अाहे. पडक्या घराकडे बघत बसण्याशिवाय कुठलाही पर्याय त्यांच्याकडे अाता उरलेला नाही. शासनाने पैशांएेवजी घर द्यावे ही त्यांची मागणी अजूनही कायम अाहे.
येथे राहणारे सचिन दिवटे म्हणाले, दाेन अाठवडे झाले तरी सरकारची कुठलिही मदत अाम्हाला मिळाली नाही. अामच्याकडे काहीच उरले नाही. काही संस्था कपडे देत अाहेत, त्यामुळे केवळ अंगावर घालण्यासाठी कपडे अापच्याकडे अाहेत. घर नसल्याने कामावर जाणे शक्य नाही, त्यामुळे राेजगार नाही. पडक्या घराकडे हताश हाेऊन बघण्याशिवाय अामच्याकडे पर्याय नाही. सरकारने अाम्हाला घर बांधून द्यायला हवे.
हनिफ पटेल म्हणाले, घर नसल्याने येथील बुद्ध विहारात अाणि समाज मंदिरात अाम्ही राहताे. घर कधी परत मिळेल माहित नाही. सर्वांची अवस्था बिकट अाहे. स्त्रीयांच्या सुरक्षेचा प्रश्न सुद्धा निर्माण झाला अाहे. सरकारने अामच्याकडे लक्ष द्यायला हवे.