पुण्यातील मुठा कालव्याच्या भिंतीला मोठे भगदाड पडल्याने जनता वसाहत परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. ड्रोननं टिपलेल्या दृश्यांमधून अनेक रस्ते पाण्याखाली गेल्याचं, घरांमध्ये पाणी शिरल्याचं आणि अनेकांचे संसार वाहून गेल्याचं भीषण चित्र पाहायला मिळतंय.
दांडेकर पूल, सिंहगड परिसरातून मुठा नदीचा उजवा कालवा जातो, याच कालव्याची भिंत कोसळली. पाणी घुसलेल्या झोपडपट्ट्यांमध्ये कोणतीही आपत्कालीन सेवा अद्यापपर्यंत पोहोचलेली नाही, यामुळे स्थानिकांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झाले आहे. खडकवासला धरणातून सोडण्यात येणारं पाणी थांबवण्यात आलं असून दांडेकर पुलावरील वाहतूकही ठप्प झाली आहे. वेळेत डागडुजी न केल्यानं ही भिंत कोसळल्याचा आरोप नागरिकांनी केल्यानं पुणे महानगरपालिका प्रशासनाकडे नजरा वळल्या आहेत.
महापौरांना घेराव
जनता वसाहत परिसरातील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नगरसेवक आणि महापौर उशिरा पोहोचले. त्यामुळे संतापलेल्या नागरिकांपैकी काही जणांनी महापौर मुक्ता टिळक यांना घेराव घातला.