पुणे : जगभरात कुठेही नदीचे पात्र कमी केले जात नाही, पण पुण्यात मात्र पुणे महापालिका हे काम ठेकेदारांना देऊन करत आहे. त्यामुळे नदीकाठी असलेल्या पक्ष्यांची घरे म्हणजे झाडे काढली जात आहेत, नदी अरूंद होत आहे, अशी खंत माजी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.
ठाकरे यांनी पुण्यात बंडगार्डन इथे सुरू असलेल्या नदीकाठ सुधारवरून ट्विटरवर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. त्यासाठी डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्याच्या हॅंडलला टॅंग देखील केले आहे. कारण आता सुरू असलेले काम नदीकाठी प्रचंड नुकसान करणारे आहे. बंडगार्डन येथील नदीकाठी पक्ष्यांचे घर म्हणजे खूप झाडं आहेत. तिथे म्हणूनच डॉ. सालिम अली पक्षी अभयारण्याचे नाव दिले आहे. सुमारे ७५ मीटर नदी अरूंद होत आहे. त्यांचा फटका भविष्यात पुणेकरांनाच बसणार आहे. मुठा नदीला पूर आला की ते पाणी इतरत्र जाणार आहे. कारण बंडगार्डन इथे मोठ्या प्रमाणावर नदीपात्रात भराव टाकला जात आहे. हे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना पुणे महापालिकेकडून घाई केली जात आहे. कदाचीत पुढील महिन्यात होत असलेल्या जी-२० परिषदेपर्यंत हे काम पूर्ण करायचे आहे. कारण तेव्हा येत असलेल्या परदेशी पाहुण्यांना हे काम दाखविण्याचा आटापिटा पुणे महापालिका करत आहे.
यापूर्वी माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे यांनी डॉ.सालिम अली पक्षी अभयारण्याला भेट दिली होती. त्यामुळे त्यांना येथील पक्ष्यांची माहिती देखील आहे. म्हणून त्यांनी याविषयी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.