पिंपरी: कागदपत्रांचा गैरवापर तसेच खोटे धनादेश सादर करून वाहन खरेदी केले. त्यानंतर त्या वाहनाची विक्री करून फसवणूक केली. या प्रकरणी तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. इंद्रायणीनगर, भोसरी येथे ६ नोव्हेंबर २०१९ ते ३१ मार्च २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
मनोज राजेंद्र बढे (रा. मोशी), राजकुमार दगडू खेंडकर (रा. दाभा, उस्मानाबाद), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह गणेश सर्जेराव घोलप (रा. भोसरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामदास मच्छिंद्र हानपुडे (वय ३५, रा. चाकण) यांनी या प्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात बुधवारी (दि. ३१) फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हानपुडे यांना सुमारे तीन वर्षांपूर्वी गाडी खरेदी करायची होती. त्यामुळे त्यांनी स्वतःचे व पत्नीचे आधारकार्ड, पॅनकार्ड यांची छायांकित प्रत व दोन फोटो घोलप यांच्याकडे विश्वासाने दिले होते. त्याने त्याचा साथीदार बढे तसेच हिंदुजा फायनान्स कंपनीमध्ये काम करणारा आरोपी खेडकर यांच्याशी संगनमत करून हानपुडे दिलेल्या कागदपत्रांचा गैरवापर केला. त्यांच्या नावाचे फेडरल बँकेमध्ये अकाऊंट असल्याचे भासवून नावाचे खोटे धनादेश सादर केले. साईबाबा सेल्स प्रा. लि. इंद्रायणी नगर, भोसरी येथील शोरूममधून वाहन खरेदी करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी ते वाहन दुसऱ्या व्यक्तीस विक्री केले. आरोपीने विश्वासघात करून फसवणूक केली, असे फिर्यादीत नमूद केले आहे.