लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “महापालिकेकडून सुरू असलेल्या विकास प्रकल्पांची माहिती देण्यासाठी पुण्याच्या महापौरांनी मला निमंत्रित केले होते. त्याप्रमाणे मी विकासकामांची माहिती घेतली. पुण्यातच नव्हे तर राज्यातल्या सर्वच महापालिकांमध्ये माझे लक्ष आहे. जेथे आमची सत्ता आहे तेथे विशेष लक्ष आहे,” असे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले़
पुणे महापालिकेतील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी फडणवीस गुरुवारी (दि. ११) आले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृहनेते गणेश बिडकर, भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह शहरातील भाजपचे आमदार व अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थित होते़
फडणवीस यांना आपण पुणे महापालिकेत विशेष लक्ष घालत आहात का, तुमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, पुण्याचे खासदार गिरीश बापट हेही या वेळी उपस्थित नाहीत, याबद्दल विचारणा झाली. त्यावर ते म्हणाले, “मला महापौरांचे निमंत्रण असल्याने मी पुण्यात आलो. पक्षात कुठलेच मतभेद नाहीत. पुण्यातील पदाधिकारी उत्तम काम करीत असून महापालिकेतील कामांना आणखी गती देण्याची आवश्यकता आहे.”
पुणे महापालिका हद्दीत २३ गावे समाविष्ट करण्याचा निर्णय झाला आहे. महापालिकेच्या हद्दीशी संलग्न भाग असेल तर वेगळी महापालिका होऊ शकत नाही, त्या भागाचा समावेश हा महापालिका हद्दीतच करावा लागतो. त्यामुळे पुण्यात दुसरी महापालिका निर्माण होणे शक्य नसल्याचे फडणवीस म्हणाले. सहा मीटरच्या रस्त्यांवर ९ मीटरचा टीडीआर वापरताना संबंधित बांधकाम हे दीड मीटरने मागे घ्यावे लागणार आहे. यामुळे ६ मीटरचे रस्ते ९ मीटर करण्याबाबतचा निर्णय स्थानिक नागरिकांच्या मान्यतेने घेणार असल्याचे ते म्हणाले.
चौकट
स्वबळावरच लढणार
पुणे महापालिकेच्या आगामी निवडणुकीत तीन पक्ष एकत्र आले तरी आम्ही कोणाशी हातमिळवणी करणार नाही. आम्ही या निवडणुका स्वबळावरच लढवणार, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आम्हाला कोणाशी युती करण्याची गरज नाही, असे ते म्हणाले.