'प्रशांतला खासदारकीसाठी माझ्या शुभेच्छा...' अजितदादांकडून जगतापांना पुणे लोकसभेसाठी शुभेच्छा
By श्रीकिशन काळे | Published: April 21, 2023 02:33 PM2023-04-21T14:33:01+5:302023-04-21T14:34:17+5:30
पुण्यात खासदार पदावर कोण विराजमान होणार? राजकीय वर्तुळात सर्वत्र चर्चा
पुणे: ‘‘प्रशांत हे आमचे जुने कार्यकर्ते आहेत. आम्ही त्यांना नगरसेवक पद दिले, महापौर केले, अनेक पदे दिली, पुण्याचे शहराध्यक्ष केले. त्यांना जर खासदार व्हायचे असेल, तर प्रशांतला माझ्या शुभेच्छा,’’ असे राष्ट्रवादीचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांना ‘शहरात भावी खासदार म्हणून प्रशांत जगताप यांचे बॅनर लागले आहेत. त्यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी देणार का ? असा प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, फेब्रुवारी २०२२ मध्येच निवडणुका होणार होत्या. तेव्हा इच्छूकांनी खूप तयारी केली. देव दर्शन केले. पण निवडणुका काही झाल्या नाहीत. त्यामुळे इच्छूक कंटाळले. आता जर प्रशांत जगताप यांचे भावी खासदार असे बॅनर लागले असतील. पण जगताप यांना आम्ही नगरसेवक केले, महापौर केले, अनेक चांगली पदे भुषविली. जर त्यांना खासदार व्हायचे असेल तर प्रशांतला माझ्या शुभेच्छा,’’ असे अजित पवार यांनी सांगितले. निवडणूक कधी लागणार यावर पवार म्हणाले, मी काय निवडणूक अधिकारी नाही. जेव्हा मला निवडणूक अधिकारी पद मिळेल, तेव्हा नक्की सांगेन की निवडणूका कधी होतील.’’यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला. निवडणूका येतात, तेव्हा काही नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी लागते, असेही शेवटी पवार म्हणाले.
दरम्यान, प्रशांत जगताप यांचा नुकताच वाढदिवस झाला. तेव्हा राष्ट्रवादी कार्यालयासमोर भलामोठा फुलांचा हार क्रेनला लावलेला होता. तेव्हा त्यावरही भावी खासदार असे मोठ्या अक्षरात लिहिलेले होते. त्यामुळे पुण्यातील रिक्त झालेल्या खासदार पदावर त्यांची उमेदवारी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.