बारामती : राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्ष आणि पवार कुटुंबात फुट पडल्यानंतर बारामतीत राजकीय समीकरण बदलली आहेत. विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी त्यांच्या भगिनी विजया पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासाठी त्यांच्या ज्येष्ठ भगिनी सरोज पाटील या बारामतीत प्रथमच निवडणुकीच्या मैदानात उतरल्या आहेत.
बारामतीत विश्वंभर चौधरी, अॅड. असीम सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली निर्भय बनो सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सरोज पाटील यांनी बारामतीकरांशी संवाद साधत जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. पाटील म्हणाल्या, माझ्यापेक्षा शरद पवार हा लहान आहे. माझा भाऊ पायाला भिंगरी लावून फिरतोय, त्याचं वाईट वाटतं. मी घरी कशी बसू? कोल्हापूरमध्ये आमचे सगळे उमेदवार निवडून येणार. मला फक्त हसन मुश्रीफ यांना पाडाचंय," अशा शब्दात पाटील यांनी मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. भाजप सोडून कुणालाही मतदान करा. हे नालायक लोकं असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली.
माझा महाराष्ट्र कसा होता आणि आज काय परिस्थिती झाली आहे. यामुळे मला रात्रभर झोप येत नाही. भाजपची ही विषवल्ली मुळासकट उपटली पाहिजे. सध्या महाराष्ट्र हा अंधारात चाचपडत आहे. प्रतिगामी शक्ती डोकेवर काढत आहेत हे पाहून अतिशय वेदना होतात, अशी खंत सरोज पाटील यांनी व्यक्त केली. सभेला प्रतिभा पवार, माजी आमदार लक्ष्मण माने उपस्थित होते.
शरद पवार काॅंग्रेसचे आणि एन डी पाटील शेतकरी कामगार पक्षाचे काम करायचे. पण ते घरात येताना राजकारणाचा जोडे बाजूला ठेवायचे. आमच्या आई वडिलांना सगळ्यात लाडका जावई एनडी होते. फाटका जावई लाडका होता.‘अजित’चे वडील अनंतराव पवार हे माझ्या मुलांचे सर्वात आवडते ‘तात्यामामा’ होते, अशी आठवण सरोज पाटील यांनी सांगितली.