बारामती : बारामती लोकसभा मतदारसंघातील मताधिक्क्याबाबत माझा दादा जे बोलला तसेच होईल. माझा येथील विजय निश्चित आहे. माझा दादा जे बोलतो ते खरे होते,असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला. सुळे यांनी बारामती येथे आई प्रतिभा पवार, भाऊ रणजित पवार, शुभांगी पवार, देवयानी पवार यांच्यासह अन्य पवार कुटुंबियांसमवेत मतदान केले. तर इंदापूर येथे माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी देखील मतदान करत आपले राष्ट्रीय कर्तव्य बजावले. लोकसभा निवडणुकीत संपूर्ण राज्यात सर्वात उत्कंठावर्धक लढत म्हणून ज्या लढतीकडे पाहिले जाते ती लढत म्हणजे बारामती मतदारसंघ..राष्ट्रवादी काँगे्रसच्या सुप्रिया सुळे व भाजपाच्या कांचन कुल यांच्यात ही लढत होत आहे. या लढतीसाठी दोन्ही प्रमुख पक्षांनी संपूर्ण ताकद पणाला लावत ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. मतदानानंतर सुळे म्हणाल्या,.मतदान करताना नेहमीच भारतीय असल्याचा अभिमान वाटतो.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सर्वांना हा अधिकार दिला आहे. मतदान करण्याची आपली सर्वांची जबाबदारी आहे. यावेळी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामतीचा गड सुप्रिया सुळे हेत जिंकणार असल्याचे सांगत मोठ्या मताधिक्क्याने त्यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना ते म्हणाले, मोदी यांच्या जाहीर सभेचे भाजपने बारामती येथे आयोजन केले होते. मात्र, त्यांनी राजकीय हवेचा अंदाज घेतला. मागील विधानसभा निवडणुकीच्या वेळी देखील मोदींनी येथे पाऊण लाखांच्या उपस्थितीत सभा घेतली होती. मात्र, मी लाखांच्या मताधिक्क्याने निवडुन आलो. त्यामुळेच अंदाज ओळखून मोदी आले नसावेत. तसेच, मोदी आले नाहीत यातच भाजपचा पराभव त्यांनी मान्य केला आहे. मोदीसाहब नही आऐ, कुछ तो लगता है, अशी त्यांच्या कार्यकर्त्यांत चुळबुळ सुरू झाली असल्याचा टोला पवार यांनी लगावला. पवार यांनी पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासह काटेवाडी येथे मतदानाचा हक्क बजावला. यावेळी पत्रकारांशी बोलत होते. बारामती आमची आहे, आमचीच राहणार . गेली अनेक वर्ष बारामतीने सहकार्य केले आहे.सांगता सभेला झालेली गर्दी सर्व काही सांगुन गेली. बारामतीकर स्वाभिमानी असल्याचे पवार म्हणाले.भाजपचा गेल्या पाच वर्षात केलेल्या कामावर विश्वासच होता.तर अनेक मतदारसंघात त्यांनी उमेदवार का बदलले ,राष्ट्रवादी आणि कॉंग्रेसकडुन उमेदवार आयात करण्याची वेळ त्यांच्यावर का आली,असा सवाल देखील पवार यांनी केला. राज्यात आघाडीला चांगले यश मिळेल,असा दावा पवार यांनी केला.———————————————...तर राजकारणातुन निवृत्ती घेईन.बारामतीत राष्ट्रवादी काँग्रेसचा विजय होणार हि काळ्या दगडावरील पांढरीरेघ आहे. बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपने जिंकल्यास राजकारणातुननिवृत्ती घेईन. मात्र,भाजपला जिंकता न आल्यास त्यांनी निवृत्तीघ्यावी,असा आव्हान अजित पवार यांनी दिले आहे.