पुणे: पॅरिसमध्ये जिंकलेले कांस्यपदक हे माझ्यावर प्रेम करणाऱ्या देशातील प्रत्येकाचे आहे. भविष्यात ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकण्याचे माझे ध्येय आहे आणि त्यासाठी मी लवकरच तयारी सुरू करणार आहे. सुवर्ण जिंकेपर्यंत माझी नेमाबीज सुरूच राहिल असा निर्धार ऑलिम्पिक कांस्यपदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे (Swapnil Kusale) याने पुण्यात व्यक्त केला.
खाशाबा जाधव यांच्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी महाराष्ट्राला दुसरे ऑलिम्पिक पदक (Paris Olympics 2024) जिंकून देणारा नेमबाज स्वप्निल कुसाळे याचे गुरुवारी पुण्यात जंगी स्वागत करण्यात आले. बालेवाडी येथे आयोजित सत्कार समारंभानंतर तो बोलत होता. पॅरिस येथून स्वप्नील हा आज भारतात परत आला असून पुणे विमानतळावर स्वप्नीलचे जोरदार स्वागत करण्यात आले. यानंतर स्वप्नीलने पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात दर्शन घेत आरती केली. यावेळी ट्रस्ट कडून स्वप्नील चे स्वागत करण्यात आले. पुण्याच्या बालेवाडी स्टेडियम मध्ये त्याने नेमबाजीचा सराव केला होता. म्हणूनच स्टेडियमला भेट देण्यासाठी तो आज दुपारी बालेवाडीला आला. याठिकाणी ढोल ताशांच्या गजरात आणि भारत माता कि जय या जयघोषात त्याची ऑर्किड हॉटेल ते शुटींग रेज जंगी मिरवणूक काढण्यात आली. तसेच या उत्तुंग कामगिरीला सलाम करण्यासाठी एका विशेष सत्कार करण्यात आला.
पुरुषांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजीत स्वप्नीलने कास्यपदक जिंकले. ऑलिम्पिकमधील ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पहिल्यांदाच पदक जिंकले आहे. या पदकावर नाव कोरुन स्वप्नीलने मोठा इतिहास रचला आहे. त्यानंतर संपूर्ण भारतातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.